अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांच्या गळ्यातील सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याची दोन गंठण चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने गंठण खेचून पळ काढल्याची एक घटना असताना, दुसर्या घटनेत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून दागिना लंपास करण्यात आला आहे.
पहिली घटना तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहकारनगर परिसरात 11 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. येथे राहणार्या सुरेखा दिलीप सरडे (वय 58) या सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवरून गुलमोहर रस्त्याकडून सपकाळ चौकाकडे जाणार्या रस्त्याने पायी घरी परतत होत्या. ओढ्याजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे 15 ग्रॅम वजनाचे, सोन्याचे गंठण बळजबरीने तोडले. गंठण हिसकावल्यानंतर हा चोरटा जवळच थांबलेल्या दुचाकीवर बसून आपल्या साथीदारासह भरधाव वेगात पसार झाला. महिलेने आरडाओरड केली; मात्र अंधारामुळे व चोरट्यांपैकी एकाने हुडी घातल्याने त्यांचा चेहरा किंवा दुचाकीचा क्रमांक स्पष्ट दिसू शकला नाही. सुरेखा सरडे यांनी शनिवारी (13 डिसेंबर) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीवाडा बसस्थानक परिसरातील इंपिरियल चौकात शनिवारी दुपारी घडली. बुरूडगाव रस्त्यावरील रहिवासी असलेल्या लता राजु शिंदे (वय 53) या दुपारी मार्केट यार्ड चौकात खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी आटोपून त्या पायी माळीवाडा बसस्थानकाजवळून इंपिरियल चौकाकडे जात असताना, एक अनोळखी महिला त्यांच्याजवळ आली. तिने खांद्यावर हात ठेवत पुण्याला जाणार्या बसस्थानकाचा पत्ता विचारला. काही क्षणांचा संवाद झाल्यानंतर ती महिला निघून गेली.
घरी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता, त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे, सोन्याचे गंठण गायब असल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शोध घेतल्यानंतरही दागिना न सापडल्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या अनोळखी महिलेनेच हातचलाखीने गंठण चोरल्याची खात्री झाली. याप्रकरणी लता शिंदे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनांमुळे महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिन्यांना लक्ष्य केले जात असल्याने, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.




