अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील केडगाव भागात एका विवाहितेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घर उघडे असल्याचा फायदा घेऊन एका व्यक्तीने घरात प्रवेश केला आणि झोपलेल्या पीडित महिलेचे हात धरून अश्लिल वक्तव्य केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (3 फेब्रुवारी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पीडित महिला राहत्या घरी हॉलमध्ये विश्रांती घेत होती. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. यावेळी विकी संधू (पूर्ण नाव माहिती नाही, रा. केडगाव) हा तरूण अनधिकृतपणे घरात शिरला. महिलेला कुणीतरी स्पर्श केल्याचे जाणवले, मात्र सासू उठवत असाव्यात या समजुतीने तिने दुर्लक्ष केले. मात्र, अचानक संधू याने तिचे दोन्ही हात पकडले आणि अश्लिल मागणी केली.
प्रसंगवधान राखून महिलेने आरडाओरड केली आणि संधूला जोरात धक्का दिला. या गोंधळामुळे संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आरडाओरड ऐकून शेजारी राहणार्या महिला मदतीला धावून आल्या. घटनेची माहिती मिळताच पिडीतेच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलीस गाठले. पोलिसांनी संधू विरूध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार गोल्हार हे करीत आहेत.





