Sunday, September 29, 2024
Homeनगरमहिलांनी केल्या मटक्याच्या टपर्‍या उद्ध्वस्त, पोलीस चौकीवरही मोर्चा

महिलांनी केल्या मटक्याच्या टपर्‍या उद्ध्वस्त, पोलीस चौकीवरही मोर्चा

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

कोल्हार भगवतीपूरमधील सर्व अवैध धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी मंगळवारी महिला आक्रमक झाल्या. भगवतीदेवी मंदिर परिसरातील मटक्याच्या टपर्‍यांची तोडफोड करून त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. चिठ्ठ्या, कागदे व अन्य साहित्य जाळण्यात आले. संतप्त महिलांनी अवैध धंद्यांविरोधात घोषणा देत पोलीस चौकी गाठली. तेथे पोलिसांना निवेदन दिले. आदिवासी, एकलव्य संघटना, लहुजी शक्ती सेना तसेच दुर्गा वाहिनी या संघटनांच्या महिलांनी उग्ररूप धारण केले. अवैध धंद्याविरोधात संतापलेल्या महिलांचा जमाव जमला. भगवतीदेवी मंदिर परिसरातील सर्व मटक्याच्या टपर्‍यांची मोडतोड करण्यात आली. त्यातील चिठ्ठ्या, कागदे जाळले. ‘गावातील अवैध धंदे बंद झालेच पाहिजे’ अशा घोषणा देत मोर्चाद्वारे महिला थेट कोल्हार पोलीस चौकीवर धडकल्या. राहात्याचे पोलीस उपनिरीक्षक सोपान काकड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे उपस्थित होते.

- Advertisement -

या निवेदनात म्हटले आहेे, कोल्हार भगवतीपूर गावात मटका अड्डे, जुगार अड्डे, गांजा विक्री, गोमांस विक्री खुलेआम सुरू आहे. या व्यवसायातून मिळणार्‍या पैशामुळे गावातील वातावरण दूषित होत आहे. तसेच भगवतीदेवी मंदिराच्या परिसरात हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे भाविकांना त्रास होत आहे. तरी गावातील अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी जमलेल्या महिलांनी पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली. अवैध धंदे करणार्‍यांकडून आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना जामीनदेखील मिळत नसल्याचा टाहो त्यांनी फोडला. अनाधिकृत व्यवसायांबद्दल पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे पोलीस निरीक्षक सोपान काकड यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. यानंतर आंदोलनकर्त्या महिला माघारी फिरल्या. येथील भगवतीदेवी मंदिर परिसरातील अवैध धंद्यांना विरोध केल्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव आणून काही जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. निर्दोष असल्याचे पुरावे देऊनही पोलीस त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आक्षेप दुर्गा वाहिनी संघटनेच्या जिल्हा संयोजक गीता परदेशी यांनी प्रतिक्रिया देतांना नोंदविला.

कोल्हार भगवतीपूर येथील साडेतीन शक्तीपीठाचे वसतीस्थान असलेल्या भगवतीदेवी मंदिरात दररोज असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. मात्र या परिसरात मटक्याच्या टपर्‍यांचे प्रदर्शन दिसून येते. धार्मिक भावना दुखावल्या जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी येथील म्हसोबा मंदिराभोवती वडाच्या झाडाजवळ काही लोक गांजा ओढत बसले होते त्यावेळी हा प्रकार निदर्शनास आला. या अवैध धंद्यामुळे मंदिर परिसरात अश्लील वर्तणूक दिसून येत असल्याची प्रतिक्रिया दुर्गा वाहिनी संघटनेच्या राहाता तालुका संयोजक साक्षी भागवत यांनी व्यक्त केली. भारतीय दलित महासंघाच्यावतीने येथील अवैध धंदे बंद करण्याबाबत नगरला पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले जाईल, असे भारतीय दलित महासंघाच्या उत्तर नगर जिल्हा महिला अध्यक्ष हिना उबाळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या