वैजापूर/नाऊर |प्रतिनिधी| Vaijapur| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रालगत असलेल्या गोवर्धन हद्दीमध्ये अवैधरित्या दारूचा व्यवसाय करणार्या दुकानात अचानकपणे रामपूर येथील सुमारे 80 ते 90 महिलांनी रुद्रावतार घेत दारूचे दुकान जाळले. तर वैजापूर तालुका वीरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलमधील सुमारे 100 पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या. यावेळी श्रीरामपूर तालुका व वीरगाव पोलिसांविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रामपूर (कोकरे) येथील महिलांनी दारूबंदीसाठी ग्रामसभा घेत, पोलीस अधीक्षक तसेच दारूबंदी व उत्पादन शुल्कचे अधीक्षक यांना स्वत: नगर येथे जाऊन लेखी निवेदनाद्वारे गोदावरी भागातील दारू बंद करण्याची मागणी केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दारू उत्पादन शुल्कचे अधिकारी यांनी सुरुवातीच्या काळात काही ठिकाणी छापे टाकून दारू बंद केली होती. त्यानंतर रामपूर गाव वगळता लगतच्या गावामध्ये अवैद्य दारु व्यवसाय पुन्हा सुरु झाल्याने, रामपूर येथील लहान मुलांसह पुरुष दारूच्या आहारी गेले. सदर महिला दैनंदिन मजुरीचे काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी पती-मुले दारू पिऊन व्यसनाधीन होऊन, प्रत्येक कुंटुबात वाद निर्माण होत असल्याने काल अखेर सकाळी 9 वाजेच्या सुमारास महिलांनी प्रथमतः गोवर्धन हद्दीतील ओढ्यात काटेरी कुंपणात सुरू असलेले अवैध दारूच्या दुकानावर हल्ला चढविला.
संबंधित दारू विक्री करणार्या दुकानदाराला समजाऊन सांगुन देखील न ऐकल्याने महिलांनी पेट्रोलच्या साह्याने सदर झोपडी वजा ग्रीन शेडला आग लावून दिली. आगीत काहीअंशी अवैध दारू दुकानचे नुकसान झाले. त्यानंतर महिलांनी आपला मोर्चा नाऊर गोदावरी नदीच्या पलीकडे वीरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाभुळगाव गंगा शिवारातील हॉटेलकडे वळविला. अगोदर संबंधित हॉटेल चालकाला समज देत, आमच्या गावातील लोकांना दारू न देण्याचा सल्ला महिलांनी दिला होता, तरीही तो दारू देत असल्याने, महिलांनी हॉटेलच्या पाठीमागे जाऊन ऊसात लपविलेल्या सुमारे 100 पेक्षा अधिक दारुच्या बाटल्या रस्त्यालगत आणून फोडल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काचाचा खच झाला होता, तर रस्त्यावरील महिलांच्या गर्दीमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांची कोंडी झाली होती.
या अवैध दारू आंदोलनात छबुबाई धनवटे, बबई धनवटे, ताराबाई इरसे, संगिता कोळेकर, रुपाली कुसळकर, रुक्मिणी उपळकर, विजया खैरे, संगिता खैरे, सुरेखा पिटेकर, इथाबाई पांढरे, सुमनबाई जाधव, रेखा जाधव, सुनीता धनवटे, ज्योती पांढरे, आशाबाई पांढरे, रेश्मा धनवटे, सुमनबाई धनवटे, आशाबाई भडांगे, मनीषा धनवटे, वैशाली कोळेकर, सुरेखा धनवटे, मनीषा उपळकर, स्वाती कोळेकर, रेखा कुसळकर, सौ. पिटेकर, कोमल धनवटे, सोनाली धनवटे आदी महिलासह अनेक महिला उपस्थित होत्या. दरम्यान श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. या घटनेच्या बाबतीत वीरगाव पोलीस मात्र अनभिज्ञ होते.
सरपंच नितीन शिंदे व ग्रामपंचायत सदस्य अमित कोकरे यांनी सांगितले की, आमच्या गावात दारूबंदी झाली, असून गावालगत काहींनी अवैध दारूची दुकाने उघडल्याने आमची तरुण पिढी तसेच अबालवृद्ध पुन्हा व्यसनाच्या आहारी गेली आहे. दिवसभराची कमाई दारूमध्येच घालत असून, यामुळे मजुरी काम करून घरी आलेल्या महिलांना रोजच त्रास सहन करण्याची वेळ आली होती. गावालगत असलेले श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्याच्या पोलीस स्टेशन हद्दीत गावालगतचे अवैध दारू व्यवसाय त्वरीत बंद करण्यात यावे, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांना बुधवारी महिलांसह जाणार असून कारवाई करायची असेल तर आजच करा, अन्यथा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दारुच्या व्यसनामुळे आमच्या कुंटुबातील कर्ता पुरुष गेल्याने मी रोजंदारी करून लहान लेकरांचा सांभाळ करते, तसेच घरातील वृद्ध व्यक्तीचा सांभाळ करणे ही तारेवरची करावी लागत आहे. यापूर्वी गावात अवैध दारुची दुकाने होती, त्या बंद झाल्या असल्या तरी गावाच्या शेजारी अनेकांनी अवैध दारूची दुकाने थाटल्याने अबालवृद्धासह मुले देखील व्यसनाधिन होत आहे. आमच्या कुंटुबातील कर्ता पुरुष गेल्याचे दुःख असून इतर महिलांवर अशी वेळ येऊ नये, अवैध दारू विक्री कायमची बंद करावी.
– रेखा जाधव