Saturday, May 4, 2024
Homeनगरअधिकार्‍याच्या ‘भेटी’ची ऑफर नाकारल्याने महिला पोलिसाला त्रास

अधिकार्‍याच्या ‘भेटी’ची ऑफर नाकारल्याने महिला पोलिसाला त्रास

अहमदनगर (प्रतिनिधी) –

पोलीस अधिकार्‍याने दिलेली भेटीची ऑफर नाकारल्याने पोलीस कर्मचारी महिलेला त्रास झाल्याची तक्रार एसपींकडे करण्यात

- Advertisement -

आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समजली. दरम्यान, संबंधित अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बडतर्फ हवालदार संजीव पाटोळे यांनी केली आहे.

नगर शहराजवळील एका पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकरणी त्या पोलीस अधिकार्‍यांविरोधात गुन्हा नोंदविण्याची मागणी पाटोळे यांनी एसपी मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. तालुक्याच्या ठिकाणी इनचार्ज असलेल्या एका पोलीस अधिकार्‍याने त्यांच्याच अधिनस्त असलेल्या एका महिला पोलीस कर्मचार्‍याला ‘बाहेर भेटण्यासाठी’

बोलविले. साहेबांच्या भेटीची ऑफर त्या महिला पोलीस कर्मचार्‍याने नाकारली. त्यानंतर तिला त्रास देणे सुरू झाले. यासंबंधीची तक्रार त्या महिला पोलिस कर्मचार्‍याने एसपींकडे केली आहे. त्याची दखल घेत एसपी मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ज्या पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला त्या पोलीस ठाण्यात त्या पोलीस अधिकार्‍याची बदली करण्यात आली आहे. वास्तविक बदली न करता त्यांचे निलंबन करणे गरजेचे होते. पण वरिष्ठांनी केवळ बदली केली. यापूर्वी याच अधिकार्‍याच्या त्रासाला कंटाळून एका पोलिस कर्मचार्‍याच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, ही बाबही पाटोळे यांनी एसपींच्या निदर्शनास आणून दिली आहे.

..अन्यथा तोंड काळे करून उपोषण

संबंधित महिला पोलीस कर्मचार्‍याने 11 जानेवारी 2021 रोजी एसपींकडे तक्रार केली. त्यानंतर 21 जानेवारीला त्या महिला पोलिसाचा जबाब नोंदविण्यात आला. महिला पोलिसाचा तो जबाब फिर्याद समजून गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी संजीव पाटोळे यांनी केली आहे. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यास पोलीस महासंचालक किंवा महिला आयोगासमोर तोंड काळे करून उपोषण करण्याचा इशारा पाटोळे यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या