Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे – मुख्यमंत्री...

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

कुंभमेळा श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधू ग्राम/टेंटसिटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत.

YouTube video player

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करुन घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ‘एआय’च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. ‘मार्व्हल’चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.

प्रचार-प्रसिद्धीसाठी ‘डिजिटल कुंभ’ संकल्पना
कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी ‘डिजिटल कुंभ’ ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिद्धीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामासंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तुनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याची सूचना फडणवीस यांनी बैठकीत केली.

तर कुंभमेळ्यासाठीची विविध कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कुंभमेळ्यासाठीची सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. पोलिसांच्या निवास व्यवस्थेसही प्राधान्य द्यावे, अशी सूचना पवार यांनी केली.

कुंभमेळा कालावधीत तसेच नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात.याशिवाय नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तर अनेक तीर्थक्षेत्रे कुंभमेळ्याच्या परंपरेशी जोडलेली असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्यात यावी, असे मत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.

या बैठकीला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल, नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, संबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे कुंभमेळा नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त करिश्मा नायर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...