अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दोन परप्रांतीय कामगारांनी निष्काळजीपणाने व बेदारकपणे ग्रँडींग मशीन एअरच्या प्रेशर पाईपने हवा मारून युवकाला जखमी केले. प्रतीक संजय सकट (वय 21, रा. राघवेंद्र स्वामी मंदिरा जवळ, बोल्हेगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. नवनागापूर एमआयडीसीतील सह्याद्री चौकातील क्लासीक व्हील कंपनीमध्ये शनिवारी (7 सप्टेंबर) पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी प्रतीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात इतरांचे जीवित किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्य केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सिंग (रा. गोपालपुरा, शमशाबाद, भिमनगर, उत्तर प्रदेश), रोशन राज (रा. लतरा, भागलपुर, बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत. प्रतीक, दीपक व रोशन हे तिघे सह्याद्री चौकातील क्लासीक व्हील कंपनीत काम करतात. ते शुक्रवारी रात्री ड्युटीवर होते.
शनिवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास दीपक व रोशन यांनी प्रतीकवर प्रेशन पाईपने हवा मारून दुखापत केली. त्याच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी प्रतीक यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोघा परप्रांतीयांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार टेमकर करत आहेत.