चेन्नई |Chennai
एकदिवसीय वर्ल्डकप 2023 मध्ये भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 199 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताने चार गडी गमावून 201 धावा केल्या आणि विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयी सुरुवात केली.
या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली ठरले. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने 97 धावांची नाबाद खेळी तर कोहलीने 85 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताची 3 बाद 2 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची जोडी जमली आणि त्यामुळेच भारताला विजय साकारता आला. कोहली आणि राहुल यांनी दुसर्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि त्यामुळेच भारताला वर्ल्ड कपमधील पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले. कोहलीचे शतक यावेळी 15 धावांनी हुकले. तो 85 धावांवर बाद झाला. पण राहुलने मात्र अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कांगारूंची सुरुवात खराब झाली. कारण बुमराहने आपल्या दुसर्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही.
यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने 69 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी तोडली. वॉर्नरने 41 धावा केल्या. स्मिथ आणि लॅबुशेनने 36 धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला 46 आणि लॅबुशेनला 27 धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 119 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला.
15 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स 15 तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस, मिचेल स्टार्कने 28 धावा करत संघाला लढाऊ धावसंख्येपर्यंत नेले.
भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.