Saturday, September 5, 2026
Homeदेश विदेश४५० वर्षांचा भौगोलिक भ्रम संपणार? आफ्रिका दिसणार मोठा; भारतासह १६४ देशांचा नकाशा...

४५० वर्षांचा भौगोलिक भ्रम संपणार? आफ्रिका दिसणार मोठा; भारतासह १६४ देशांचा नकाशा बदलाला पाठिंबा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगाच्या नकाशाच्या रचनेत मोठा बदल करण्याच्या दिशेने संयुक्त राष्ट्रांनी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने पारंपरिक ‘मर्केटर प्रोजेक्शन’ऐवजी जगाचा भौगोलिक आकार अधिक अचूकपणे दाखवणाऱ्या ‘इक्वल अर्थ’ प्रोजेक्शनला प्रोत्साहन देणाऱ्या ठरावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला तब्बल १६४ देशांनी पाठिंबा दिला, तर केवळ अमेरिकेने विरोध केला आणि सहा देश मतदानापासून दूर राहिले. भारतानेही या ठरावाच्या बाजूने मतदान केले.

- Advertisement -

मात्र, याचा अर्थ असा नाही की उद्यापासून जगभरातील सर्व नकाशे अनिवार्यपणे बदलणार आहेत. हा ठराव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. त्यामुळे मर्केटर नकाशाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. त्याऐवजी शाळा, शैक्षणिक संस्था, माध्यमे, आंतरराष्ट्रीय संघटना आणि डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्मनी वास्तविक क्षेत्रफळ अधिक अचूक दाखवणाऱ्या नकाशांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

नेमका काय बदल होणार?
जगभर मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे मर्केटर प्रोजेक्शन १५६९ मध्ये फ्लेमिश कार्टोग्राफर गेरार्डस मर्केटर यांनी विकसित केले होते. ते प्रामुख्याने सागरी नौकानयनासाठी तयार केले गेले होते. या नकाशात पृथ्वीच्या ध्रुवांजवळील प्रदेश त्यांच्या वास्तविक आकारापेक्षा खूप मोठे दिसतात तर विषुववृत्ताजवळील प्रदेश तुलनेने लहान दिसतात ही खरी समस्या होती. आता नवीन ‘इक्वल अर्थ प्रोजेक्शन’चा उद्देश ही विकृती कमी करणे आणि खंडांचा आकार अधिक अचूकपणे दर्शवणे हा आहे.

तुरुंगात विषप्रयोग…, राहुल गांधींनी टॉक्सिक टेस्ट सांगितली; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

आफ्रिका एवढी मोठी आहे?
मर्केटर नकाशाकडे पाहिल्यावर ग्रीनलँड आणि आफ्रिका जवळपास समान आकाराचे असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात मात्र आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा सुमारे १४ पट मोठी आहे. याच विकृतीकडे लक्ष वेधत आफ्रिकन देशांनी ‘Correct the Map’ ही मोहीम सुरू केली. आफ्रिकन युनियनच्या पाठिंब्याने टोगोने संयुक्त राष्ट्रांमध्ये हा प्रस्ताव पुढे नेला. समर्थकांच्या मते, नकाशावर आफ्रिकेचा आकार सातत्याने कमी दिसल्यामुळे या खंडाबद्दल जगाच्या मनात चुकीची भौगोलिक प्रतिमा निर्माण झाली.

नवीन नकाशाच्या ठरावाला संयुक्त राष्ट्र महासभेत १६४ देशांचा पाठिंबा मिळाला. परंतु अमेरिकेने विरोधात मतदान केले तर सहा देश तटस्थ राहिले. जरी हा ठराव कायदेशीररित्या बंधनकारक नसला तरी शिक्षण, संस्था आणि इतर ठिकाणी अधिक अचूक जागतिक नकाशे वापरण्यासाठी सदस्य देशांना प्रोत्साहित करणे हा त्याचा उद्देश आहे.

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या ‘नकाशा दुरुस्ती’ ठरावाचे स्वागत केले आहे. समान-क्षेत्रफळ प्रक्षेपण यासाठी महत्त्वाचे आहे कारण ते खंडीय किंवा प्रादेशिक भूभागांचा सापेक्ष आकार आणि क्षेत्रफळ जतन करते असं भारतीय राजनैतिक अधिकारी रघु पुरी संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले.

आता शाळा आणि डिजिटल नकाशांमध्येही बदल?
संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा पुढील परिणाम शैक्षणिक नकाशे, पाठ्यपुस्तके, माध्यमे आणि डिजिटल मॅपिंग सेवांवर होऊ शकतो. टोगोने वर्षअखेरीपर्यंत आपल्या शालेय भूगोलाच्या साहित्यामध्ये मर्केटरऐवजी अधिक अचूक नकाशा वापरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याशिवाय इतर देश, शाळा, आंतरराष्ट्रीय संस्था आणि तंत्रज्ञान कंपन्यांनीही अशा नकाशांचा वापर करावा, यासाठी टोगो पुढाकार घेणार आहे.

‘जगाचा नकाशा बदलला’ म्हणजे नेमकं काय?
सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये ‘जगाचा नकाशा बदलला’ असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात पृथ्वीवरील देशांच्या सीमा किंवा आकार बदललेले नाहीत. बदल नकाशावर पृथ्वी दाखवण्याच्या पद्धतीत म्हणजेच map projection मध्ये आहे. यामुळे आफ्रिका अचानक मोठी झालेली नाही किंवा अमेरिका-युरोप प्रत्यक्षात छोटे झालेले नाहीत. नव्या नकाशात त्यांचे वास्तविक क्षेत्रफळ अधिक अचूक प्रमाणात दिसणार आहे.

ताज्या बातम्या

Monsoon Update : महाराष्ट्रासह २४ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; ८० किमी...

0
मुंबई | Mumbai ऑगस्ट महिन्यात दडी मारल्यानंतर देशात मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) खरीप पिके...