Thursday, November 21, 2024
Homeब्लॉग१० सप्टेंबर 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष'

१० सप्टेंबर ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन विशेष’

आत्महत्या हा अनेक दशकांपासून आपल्या समाजात दुर्लक्षिलेला विषय राहिला आहे. सुशांतसिंग राजपूत, भय्यूजी महाराज अशा अनेक व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षामध्ये यावर समाजात थोड्याफार प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. जसे आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत तशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणाईच्या आत्महत्या या देखील महत्वाच्या समस्या आहेत. आणि म्हणूनच आत्महत्या रोखण्यासाठी International association for suicide prevention आणि World health organization या संस्थांनी पुढाकार घेऊन २००३ पासून १० सप्टेबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन(World suicide prevention day) म्हणून साजरा केला जातो.

आत्महत्त्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावांबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकतात, हे सांगण्याचे औचित्य म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. आत्महत्या या विषयावर मोकळेपणाने बोलल्याने जीव वाचू शकतो हे दर्शविण्यासाठी या दिवशी पिवळी रिबन लावली जाते. आत्महत्त्येला नेहमीच पर्याय असतो हे या पिवळ्या रिबनद्वारे दर्शविण्याचा प्रयत्न आहे. आत्महत्त्येच्या प्रमाणाबद्धल अनेक सर्वेक्षण झालेली आहे, त्यामध्ये महिलांचे वाढते प्रमाण,विद्यार्थ्यांचे वाढते प्रमाण तसेच १० ते १४ वर्ष वायोगटामध्ये सुद्धा वाढते प्रमाण दिसून येते आहे. आत्म्हत्त्येची कारणे अनेक आहेत त्याबद्दल देखील विचार होणे गरजेचे आहे .

- Advertisement -

त्यामध्ये वाढती बेरोजगारी,आईवडिलांच्या वाढत्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा,नकारात्मक विचार, नवीन काही करण्यापेक्षा एकाच क्षेत्राकडे असणारी ओढ यामुळे येणारे अपयश कामाचे अभ्यासाचे नियोजन नसणे, आपल्याला नेमके काय करायचे हेच माहित नसणे,द्विधा मनस्थिती असणे कधी कधी चुकीचे मार्गदर्शन, सोशल मिडीयाचा अतिवापर,वास्तविक जगापेक्षा काल्पनिक जगात वावरणे,सामाजिक,आर्थिक अडचणी यातून होणारे मानसिकतेत बदल या सर्व गोष्टीतून वाढत जाणारा ताणआणि यातून येणारे नैराश्य यामुळे जीवन नकोशे वाटणे,झोप न लागणे. कोणत्याच गोष्टीत मन न रमणे,एकटे वाटणे, कोणतेही काम आपण करू शकत नाही अशी हताश भावना होणे, नशिबाला दोष देणे ,चीडचीडेपणा वाढणे, राग येणे, नेहमी थकल्यासारखे वाटणे,या जगात कोणीही आपले नाही अशी भावना सतत सतावणे,वजन कमी होणे, व्यसनाच्या आहारी जाणे,आत्महत्त्येचे विचार येणे अशा प्रकारची लक्षणे वाढत्या नैराश्यातून निर्माण होतात. परिणामी अनेक लोक चुकीचे पाऊल उचलतात आणि जीवन संपवतात.अशा काही केसेस रुग्णालयांपर्यंत येतात ,समुपदेशनाच्या माध्यमातून आणि औषधोपचार घेऊन काहींचे जीवन सुधारते .पण काही व्यक्तींना कुठे जायचे ?कोणाशी बोलायचे ?काय करायचे ?हे समजत नसल्यामुळे तसेच आपण यातून बाहेर पडू शकणार नाही या भावनेतून चुकीचे,टोकाचे पाऊल उचलले जाते.

आत्महत्या रोखण्यासाठी तसेच सुदृढ मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.
१.नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
२.नियमितपणे ध्यानधारणा,विपश्यना,योगा करणे.
३.आपल्या जीवनाबद्दल नकारात्मक दृष्टीकोन न ठेवता सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे.
४.व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
५.स्वतः साठी ,कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे .
६.कुटुंबामध्ये नियमित संभाषण असले पाहिजे, कुठल्याही प्रकारची मानसिक समस्या जाणवल्यास मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्रज्ञ , समुपदेशक यांचा सल्ला घेतला पाहिजे.
७.नकारात्मक तसेच चुकीच्या मार्गदर्शन करणाऱ्या सहकाऱ्यापासून, मित्रांपासून सावध राहा.
८.रात्रीच्या वेळी मोबाईलचा अति वापर, अतिप्रमाणात इंटरनेटचा वापर ,सोशल मिडीयाचा अतिप्रमाणात वापर ,वेब सिरीज बघणे या गोष्टी टाळल्या पाहिजे यासंबंधी तरुण पिढीला देखील मार्गदर्शन केले पाहिजे.
९.मुलांमध्ये झोप कमी होणे,चीडचीडेपणा वाढणे,सारखे – सारखे मोबईल मध्ये पाहणे, कमी बोलणे अशा समस्या दिसल्यास समुपदेशन करणे.
१०.आपल्या सहकारी व्यक्ती, घरातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी इत्यादी व्यक्तींना काही समस्या जाणवल्यास त्यांना आपण प्रेमाने समजून घेतले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे ,हे सर्व जर आपण एकत्र येऊन केले तर समाजात जनजागृती होऊन आत्महत्या थांबतील.म्हणूनच आपण म्हणू शकतो,

नको दुरावा द्या आधार
होतील बरे सर्व मानसिक आजार.

डॉ.सारिका क्षिरसागर
मानसशास्र विभाग
के.टी.एच.एम.महाविद्यालय नाशिक.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या