बीड । Beed
भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्यांपैकी मोठ्या असलेल्या पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे या दोघी राजकारणात सक्रीय आहेतच. आता त्यांची धाकटी कन्या यशश्री मुंडेही राजकीय प्रवासाची सुरुवात करीत आहे. बीडमधील वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीतून त्या आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करत आहेत.
पेशाने वकील असलेल्या यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबातील तिन्ही कन्या आता सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्या आहेत. यशश्री यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून बीडच्या राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर त्यांनी अधिकृतरित्या निवडणूक अर्ज दाखल करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे.
वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज, १२ जुलै, हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आतापर्यंत तब्बल ७२ नामनिर्देशक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जांची छाननी १४ जुलै रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची मुदत १५ ते २९ जुलै दरम्यान ठेवण्यात आली आहे. या निवडणुकीत माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचाही सहभाग असून, महिला प्रवर्गातून कोणताही दुसरा अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. दुसरीकडे यशश्री मुंडे सामान्य प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
यशश्री मुंडे या वकिलीचे शिक्षण पूर्ण करून अनेक वर्षे परदेशात वास्तव्यास होत्या. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘कार्नेल युनिव्हर्सिटी’ने त्यांना ‘प्रॉमिसिंग आशियाई विद्यार्थिनी’ म्हणून गौरवले होते. तशा त्या अद्यापपर्यंत राजकारणात फारशा दिसल्या नव्हत्या. मात्र आता त्या बँक निवडणुकीच्या माध्यमातून प्रथमच जनतेसमोर राजकीय भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे बीडच्या राजकारणात नव्या घडामोडींचा सुरुवात होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




