Sunday, November 24, 2024
Homeनाशिकवाहक मारहाण प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वाहक मारहाण प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

येवला । प्रतिनिधी

तिकीट देण्याच्या कारणावरून येवला आगारातील वाहक व महिला स्थानक प्रमुख यांना झालेल्या मारहाण प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात शारदा देविदास भाटशिनगर, लताबाई परसराम नवघीरे, संगीता बाळू जोगदंड, ज्ञानेश्वर जोगदंड, बाळू जोगदंड, शोभा ज्ञानेश्वर जोगदंड, पिवळा व निळा शर्ट घातलेला अज्ञात इसम, दाढीवाला अज्ञात इसम अशा ८ जणांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा एसटी महामंडळाच्या सर्व संघटनांनी दिला होता. मात्र उन्हाळी सुट्ट्या व एसटी कर्मचारी प्रवाशी बांधवांना त्रास होऊ नये यासाठी चक्काजाम आंदोलन मागे घेतले गेले आहे.

हे ही वाचा : …तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल; शेंडगेंचा इशारा

येवला आगारात कार्यरत असलेले वाहक दिपक अलगट शनिवारी, (दि. २५) आपल्या सहकारी चालकासह MH 06 S 8396 या बसवर येवला शिर्डी मालेगाव कर्तव्यावर होते. कोपरगावहून येवल्याकडे येत असताना विंचूर चौफुलीवर असलेल्या सिग्नलवर गाडी थांबलेली होती. दरम्यान, एक अज्ञात प्रवाशी बसमध्ये बसला विंचूर चौफुली इथून तिकीट देता येत नाही त्यामुळे तुम्ही स्टँडवरून बसा अशी सूचना वाहक दीपक अलगट यांनी केली असता, मला कोपरगाव इथून तिकीट द्या अशी मागणी सदर प्रवाशाने केली. त्यानुसार वाहकाने तिकीट दिले.

हे ही वाचा : नाशकात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३० तास धाड अन् सापडले २६ कोटींचे घबाड

बसने येवला स्टँडवर प्रवेश करताच इतक्या कमी अंतरासाठी मला तिकीट का दिले यावरून वाहकाशी वाद घालायला सुरवात करून मारहाण केली. यात वाहकाचे कपडे फाटले, वाहकाच्या खिशात असलेली ४५० रु शासकीय रक्कमही काढून घेतली व येवला स्टँडवर दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वाहक दीपक अलगट यांनी आपला जीव वाचवत स्थानक प्रमुख अर्चना दाणी यांच्या केबीनकडे धाव घेतली.

यादरम्यान सदर प्रवाशाने फोन करून काही महिला पुरुषांना स्टँडवर बोलावून घेतले. या सर्वांनी स्थानक प्रमुख यांच्या केबिनमध्ये मोठा गोंधळ घातला. स्थानकप्रमुख अर्चना दाणी यांना मारहाण करत घाण भाषेत शिवीगाळ करत महिला अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर हा सर्व जमाव येथून पसार झाला.

हे ही वाचा : ‘प्रिपेड टास्क’ देऊन ६५ लाख उकळले; शहरातील ११ बिल्डर, नोकरदारांची एकाच पद्धतीने फसवणूक

वाहक दीपक अलगट यांनी स्थानक प्रमुख यांच्या केबीनमध्ये आश्रय घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला अन्यथा विपरीत झाले असते अशी प्रतिक्रिया स्थानकावर असलेल्या प्रवाशांनी दिली. यानंतर येवला आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन करत संबंधितावर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत चक्काजाम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवाशांच्या हिताचा विचार करून काही वेळाने चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

येवला शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची बसस्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सदर कर्मचारी कधीही हजर रहात नसल्याचे दिसून आले आहे. घटना घडली त्यावेळी सदर कर्मचारी हजर असता तर एवढ्या मोठ्या जीवघेण्या हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ एसटी कर्मचाऱ्यावर व महिला अधिकाऱ्यांवर आली नसती. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सुमारे दीड तासाने पोलीस आल्याने संशयितांना पळून जाण्यास वाव मिळाला असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या