अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात शनिवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सहभागी होत योगाचे धडे घेतले. यावेळी जिल्हाभरात 8 लाख 84 हजार 943 जण या उपक्रमात सहभागी झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि अन्य व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शनिवारी सकाळी 6.30 ते 7.45 या वेळेत ‘ऐतिहासिक योग संगम’ हा कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील 5 हजार 272 शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या, जिथे सर्व व्यवस्थापनातील 8 लाख 33 हजार 558 विद्यार्थी, 20 हजार 685 प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, तसेच 20 हजार 700 पालक आणि अन्य पाहुणे या योग दिनाच्या उपक्रमात सहभागी होऊन ‘ऐतिहासिक योग संगम’ पूर्ण केला. जिल्ह्यात अशा प्रकारे एकाच दिवशी 8 लाख 84 हजार 943 विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी योग दिन साजरा केला असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, खेळ संघटना आणि विविध योग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने नगरच्या वाडिया पार्क येथे उत्साहवर्धक वातावरणात योग दिन साजरा झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब बुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग दिनाची सुरुवात करण्यात आली.
योग दिनाचे महत्व स्पष्ट करून योग दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. या कार्यक्रमात शहरातील विविध खेळ संघटना, पोलिस अॅकॅडमी प्रशिक्षणार्थी, खेळाडू, नागरिक आणि योगसाधक सहभागी झाले होते. आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था, योग विद्याधाम, एमएमवायटीसी, योग संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू, नागरिक आणि मान्यवरांनी योग प्रार्थना, आसने, प्राणायाम, ध्यान धारणा करून व योग संकल्पद्वारे योग दिन साजरा केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, श्रीमती प्रियंका खिंडरे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, प्रविण कोंढावळे, विशाल गर्जे, मनिष राठोड, अविनाश काळे, शैलेश गवळी, मल्हार कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.




