अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नाचे आमिष दाखवून ठाणे येथील तरूणीवर चांदा (ता. नेवासा) येथील तरूणाने वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 27 वर्षीय पीडित तरूणीने यासंदर्भात मंगळवारी (4 नोव्हेंबर) येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन रमाकांत डहाळे (वय 25, रा. चांदा, ता. नेवासा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. रोहनची ठाणे येथील तरूणीसोबत ओळख झाली. त्याने तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. 17 ऑक्टोबर 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान, त्याने तरूणीवर मुळा डॅम, बाभुळगाव रस्त्यावरील एका रिसॉर्टवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. काही काळानंतर, जेव्हा पीडितेने या कृत्याबाबत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रोहनने त्याच्याकडे असलेले पीडितेचे खासगी फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
तू जर कोठे तक्रार केलीस, तर हे सर्व फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित तरूणीने अखेर धाडस दाखवत मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून अत्याचार, अॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) शिरीष वमने करीत आहेत.




