श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील बनपिंप्री शिवारात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा खून करून मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फातिमा उर्फ आसमा शोयबउल्ला शेख (वय अंदाजे 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, पोलीस तपासानंतर संशयित आरोपी कल्याण राजेंद्र पठारे (रा. बनपिंप्री) यास अटक करण्यात आली आहे. त्याचे इतर साथीदार सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. बनपिंप्री हे नगर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचे गाव आहे.
हा खून 17 मे च्या पूर्वी झाल्याचा अंदाज आहे. प्रशांत हॉटेल, बनपिंप्री येथे राहत असलेल्या फातिमाचा मृतदेह हातवळण (ता. अहिल्यानगर) येथील शेत गट क्रमांक 111 मध्ये पुरण्यात आला होता. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक मनोहर हनुमंत खिळदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (18 मे) पहाटे कल्याण पठारे व त्याच्या साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पठारे हा या हॉटेलचा चालक असल्याची माहिती आहे. खुनासाठी कोणते कारण होते हे अद्याप अस्पष्ट असून, संशयित आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने स्कॉर्पिओ (एमएच 16 एटी 6979) वाहनातून मृतदेह नेऊन शेतात पुरल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस चौकशी आणि शवविच्छेदन अहवालावरून हे प्रकरण खुनाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर खुनाच्या गुन्ह्यात इतर सहभागी असलेल्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कल्याण पठारे याने गुन्हा कबूल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणामुळे बनपिंप्री परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रशांत हॉटेलमधील अवैध कृत्ये, विदेशी महिलांची तस्करी व त्यातून घडणारे गंभीर गुन्हे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
हॉटेलमध्ये देहव्यापार
बनपिंप्री येथील प्रशांत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळत आहे. केवळ परराज्यातून नव्हे, तर परदेशातून विशेषतः बांगलादेशमधून महिला या अवैध व्यवसायासाठी येथे आणल्या जात असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या दहशतवादविरोधी पथकाने मागील महिन्यात अशाच चार बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे बनावट भारतीय आधार कार्ड सापडले होते. सध्या जी महिला मृतावस्थेत आढळली, ती देखील बांगलादेशी असावी असा पोलिसांना संशय आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.