अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
इन्स्टाग्राम आयडी न दिल्याचा राग मनात धरून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना वाकोडी फाटा सोलापूर रस्ता परिसरात रविवारी (14 डिसेंबर) रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडित 23 वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तीन तरूणांविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंग व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय ठाणगे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हरिमळा, सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) आणि इतर दोन अनोळखी तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री संशयित आरोपींनी दुचाकीवरून फिर्यादी युवतीचा पाठलाग केला. रस्त्यात अडवून अजय ठाणगे याने युवतीचा हात पकडला. त्याने तिचा ड्रेस फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
अजय सह इतर दोघांनी पीडित युवतीला शिवीगाळ करत पाहून घेतो अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदरची घटना घडल्यानंतर पीडित युवतीने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी अजय ठाणगे व त्याच्या दोन साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार रेवनाथ मिसाळ अधिक तपास करीत आहेत.





