अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बोल्हेगाव उपनगरात राहणार्या युवतीची छेडछाड करत तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (1 फेब्रुवारी) सायंकाळी घडली आहे. या घटनेदरम्यान युवतीच्या आई-वडील व भावालाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित 21 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. ऋषीकेश नागथाई, प्रसाद भंडारी (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. बोल्हेगाव) व अमोल कचरे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ऋषीकेश नागथाई हा नेहमी अश्लिल नजरेने पाहणे, हातवारे करणे, शिट्ट्या वाजवणे तसेच डोळा मारणे असे प्रकार करत होता. याबाबत त्याला व त्याच्या कुटुंबीयांना वारंवार समजावून सांगण्यात आले होते. मात्र, त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.
रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ऋषीकेश व त्याचे मित्र प्रसाद भंडारी आणि अमोल कचरे हे तिघे जण फिर्यादीच्या घराजवळ आले. त्या वेळी घरात एकटी बसलेल्या फिर्यादीला उद्देशून त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करत अश्लिल व अपमानास्पद शब्द वापरले. फिर्यादी कपडे काढण्यासाठी जिन्याने वर जात असताना तिघांनी घराच्या कंपाउंड गेटमध्ये प्रवेश करून ऋषीकेश नागथाई व प्रसाद भंडारी यांनी तिचा हात जबरदस्तीने धरत तिला गेटबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादीने आरडाओरडा केल्यावर तिचा भाऊ, आई व वडील हे तातडीने बाहेर आले. त्यांनी फिर्यादीचा हात सोडवून जाब विचारताच तिघा संशयित आरोपींनी तिच्या आई-वडील व भावाला मारहाण केली. घटनेदरम्यान परिसरात नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपींनी शिवीगाळ करत, पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला.





