अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विवाहित महिलेला लपवून ठेवल्याच्या संशयावरून युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. अंगावर थंड पाणी टाकले व सिगारेटचे चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. विपुल प्रवीण कळसकर (वय 20 हल्ली रा. तापकीरनगर, एमआयटी कॉलेज जवळ, देहु रस्ता फाटा, आळंदी, जि. पुणे, मुळ रा. कडा, ता. आष्टी, जि. बीड) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरची घटना देहू रस्ता, आळंदी पोलीस ठाणे हद्दीत घडल्यामुळे पुढील तपासकामी सदरचा गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रवीण खेडकर, बाबासाहेब शिरोळे (पूर्ण नावे नाहीत, दोघे रा. खेडकर वस्ती, कडा), अजित शेंडगे (पूर्ण नाव नाही रा. कडा), शेंडगे सर (पूर्ण नाव नाही, रा. टाकळी ता. आष्टी, जि. बीड) व बाळासाहेब गायकर (पूर्ण नाव नाही, रा. सावरखेडा, ता. आष्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री साडेदहा ते सोमवारी (7 ऑक्टोबर) पहाटे पाचच्या दरम्यान तापकीरनगर, एमआयटी कॉलेज जवळ, देहू रस्ता फाटा, आळंदी येथे घडली आहे.
विपुल कळसकर हे आळंदी येथे खासगी नोकरी करतात. ते रविवारी रात्री त्यांच्या रूमवर असताना संशयित आरोपी साडेदहा वाजता तेथे आले. त्यांनी विवाहित महिलेला लपवून ठेवल्याच्या संशयावरून विपुला बळजबरीने रूमवरून चारचाकी वाहनात बसविले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईप व वायरने मारहाण करून गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सिगारेटचे चटके देऊन अंगावर थंड पाणी टाकले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.