Monday, May 27, 2024
Homeनगरतरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

तरुणाचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एका समाजाच्या मुलीसोबत बोलत असल्याच्या कारणातून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी (दि. 8) रात्री भिंगारमध्ये घडली. महेश अशोक गोराडे (वय 26 रा. श्रेयसपार्क माधवबाग, भिंगार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

- Advertisement -

उपचारादरम्यान त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून सुमारे 18 ते 20 जणांविरूध्द अपहरण, खुनाचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 13 जणांना स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांनी रात्रीतून ताब्यात घेत अटक केली आहे. जाफरखान, असद मेडिकलवाल्याचा मुलगा त्यांच्या सोबतचे अनोळखी तिघे, सोहेल मोमीन, शोएब मोमीन त्यांच्या सोबतचे अनोळखी दोघे, अफताप सय्यद, शाकीर शेख, मुज्जु शेख, फैजल शेख, इम्रान शेख, अरबाज काजी, आसिफखान, अनिस पठाण, अब्दुल शेख (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा.भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

रविवारी सायंकाळी महेश हा भिंगार कमानीजवळ त्यांच्या ओळखीच्या एका मुलीसोबत बोलत असताना तेथे जाफरखान, आसद मेडिकलवाल्याचा मुलगा व तीन अनोळखी इसम आले. त्यांनी महेश यांना मारहाण करून दुचाकीवर बसून एका पान स्टॉल जवळील धार्मिक स्थळाजवळ नेले. तेथे सोहेल मोमीन, शोऐब मोमीन, दोन अनोळखी इसम आले व त्यांनी सर्वांनी महेश यांना मारहाण केली. त्यांनी महेश यांना मोरे वस्ती (ब्रम्हतळे) येथील रस्त्यावर उतरवून पुन्हा मारहाण केली. तेथे आणखी एक इसम आला व त्याने पाईपने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मारहाण करणार्‍यांनी महेश यांना आलमगीर येथील एका जीम जवळ आणले. तेथे बरेच लोक जमले होते. तेथे त्यांना नाक व तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस येतील म्हणून एका स्कॉर्पिओतून महेश यांना सुप्याच्या (ता. पारनेर) दिशेने घेऊन गेले. पोलिसांनी सदरची स्कॉर्पिओ सुपा शिवारात अडविली व महेश याची सुटका केली. त्यांना मारहाण करणार्‍या 13 जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या