अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
केडगाव औद्योगिक वसाहतीत एक अनोळखी तरूणाचा (वय 35) मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्या तरूणाची ओळख पटवून त्याचे मारेकरी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आले. दरम्यान, तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. यासंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
अंदाजे 35 वर्ष वयाचा एक अनोळखी पुरूष इंडस्ट्रियल एरियातील रॉयल इनफिल्ड शोरूमजवळ बेशुध्द अवस्थेत आढळून आला. रूग्णवाहिकेतून त्याला सकाळी 11:10 वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोठे यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. डॉ. बोठे यांच्या खबरीवरून पोलीस अंमलदार रमेश शिंदे यांनी कोतवाली पोलिसांना दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.
त्या तरूणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृत्यू मारहाणीत झाला असल्याचा अहवाल कोतवाली पोलिसांना सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला. यासंदर्भात अनोळखी व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे निरीक्षक दराडे यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अमोल भारती, निरीक्षक दराडे यांनी भेट दिली असून तपासाबाबत सुचना केल्या आहेत.





