राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात काम करत असलेल्या तरुणाच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून कामगार जागीच ठार झाल्याची घटना दि. 5 ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेबाबत चौघांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप इंद्रभान भोसले, वय 30 वर्षे, रा. गळनिंब ता. श्रीरामपूर, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 5 ऑगस्ट 2024 रोजी रात्री एक वाजे दरम्यान राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावरील एका ट्रॅक्टर शोरुम समोर सिएनजी पाईपलाईन साठी खोदलेल्या खड्ड्यात दत्तात्रय चितळकर, प्रदीप भोसले तसेच आकाश देवढे हे तीन कामगार जिओ कंपनीची केबल जोडणीचे काम करीत होते. त्यावेळी मातीचा ढिगारा त्यांच्या अंगावर पडून तीघेजण मातीच्या ढिगार्याखाली दबले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी त्या तिघांना ताबडतोब खड्ड्याच्या बाहेर काढले. या घटनेत प्रदीप भोसले (वय 27), रा. गळनिंब ता. श्रीरामपूर, हा कामगार जागीच ठार झाला तर आकाश देवढे व दत्तात्रय चितळकर हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जियो कंपनी तसेच सीएनजी कंपनीचे अधिकारी, सुपरवायझर यांनी सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करताना संरक्षणासाठी लागणारे साहित्य न पुरवता अगर सदर खोदलेल्या खड्ड्याच्या अवती भोवती बॅरेकेटींग न करता त्यांचे जिवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. दोन्ही कंपनीचे अधिकारी यांनी कामात निष्काळजी व हलगर्जीपणा केला. तसेच कामगारांना योग्य त्या सुविधा न पुरविल्यामुळे अपघात होऊन प्रदीप भोसले या कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस दोन्ही कंपनीचे अधिकारी व सुपरवायझर हे जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संदीप इंद्रभान भोसले यांच्या फिर्यादीवरून प्रताप टेक्निशियन प्रायव्हेट लिमीटेड कंपनी व सिएनजी कंपनीचे अधिकारी व सुपरवायझर अशा चार जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गभारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125 (अ), 125 (ब), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.