अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या वेदनादायक घटनांमध्ये एका युवकाचा शेततळ्यात बुडून तर एका अल्पवयीन मुलीने (वय 17) गळफास घेतल्याने मृत्यू झाला. या संबंधित घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे व अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नांदगाव (ता. अहिल्यानगर) येथील कोळपे आखाडा परिसरात रविवारी (16 नोव्हेंबर) सकाळी शिरोमणी अनिल जाधव (वय 23) हा युवक शिंदे यांचे शेततळ्यात पडल्याने गंभीर अवस्थेत होता. त्याला तातडीने नातेवाईक किसन जाधव यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र औषधोपचारापूर्वीच दुपारी 2 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस अंमलदार जाधव करीत आहेत.
दरम्यान, दुसरी घटना वडगाव तांदळी (ता. अहिल्यानगर) येथे घडली. सिध्दी दीपक रणसिंग (वय 17) हिने रविवारी (16 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार थोरात हे करीत आहेत.




