शहादा –
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर अमळनेरच्या प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरले.दरम्यान, गुणवत्ता कितीही असली तरी मेहनत आणि संयम असेल तरच यश प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी केले..
दि.16 ते 20 जानेवारी दरम्यान शहादा येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप सोमवारी प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितिन बारी, विवेक लोहार, अधिष्ठाता प्रमोद पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, संस्थेचे मकरंद पाटील, उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, प्राचार्य आर.एस.पाटील, जयश्री पाटील, समन्वयक उपप्राचार्य डॉ.एन.के.पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सुनील पाटील, ईश्वर पाटील, सातपुडा साखर कारख्यान्याचे उध्दव पाटील, अधिसभा सदस्य मनिषा चौधरी, दिनेश नाईक, दिनेश खरात, डॉ.सत्यजित साळवे, प्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, प्राचार्य बी.के.सोनी, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.डी.एम.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पाटील, प्राचार्य सौ.जे.आर.पाटील मंचावर उपस्थित होते. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलतांना प्रार्थना बेहरे यांनी कलावंतांनी मेहनत आणि संयम अंगी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपला जीवनपट उलगडतांना त्या म्हणाल्या की, मी गुजरात राज्यात शिकले. डॉक्टर होता आले नाही म्हणून बी.एस्सी. केले. त्यानंतर मुंबईत येऊन वृत्तपत्रविद्येचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. स्टारच्या हिंदी चॅनलसाठी रिपोर्टींग करतांना अनेक नामांकित कलावंतांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती घेतांना आपणही दिग्दर्शन करावे असे वाटू लागले. रेणूका शहाणे यांच्या रिटा चित्रपटासाठी सहायक म्हणून काम केले. त्याचवेळी अभिनयाची ऑडीशन दिली. त्यातून पवित्र रिश्ता या मालिकेसाठी निवड झाली. जय महाराष्ट्र भटिंडा ढाबा हा माझा पहिला मराठी चित्रपट. पुढे काही चित्रपट चांगले चालले. या सर्व प्रवासात संयम हा अंगी असणे आवश्यक हे मी शिकले. गुणवत्ता कितीही असली तरी मेहनत आणि संयम असेल तर यश प्राप्त होऊ शकते. महाविद्यालयात शिकतांना मी कधीही स्टेजवरील कार्यक्रमात सहभागी झाले नाही. चित्रपटात काम करेल असेही कधी वाटले नाही. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे उर्जा प्राप्त होते आणि कलावंतांसाठी ही ऊर्जा महत्वाची ठरते असे त्या म्हणाल्या. यावेळी प्रार्थना बेहेरे यांनी तीन/चार विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावून त्यांच्या समवेत सेल्फी काढला. तसेच सावर रे या गाण्यावर काही क्षण काजल पाटील व आकाश पाथरवट या विद्यार्थ्यांसोबत परफॉर्मन्स केला. सर्व विद्यार्थ्यांचे व्हिडिओ चित्रण करुन स्टेजवरुन सेल्फी देखील काढला.
संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी पाच दिवसात विद्यार्थ्यांनी विविध रंग संस्कृतीची मुक्त उधळण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ही संस्था शेतकर्यांच्या मेहनतीवर उभी असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनी हा महोत्सव म्हणजे स्त्री-पुरुष समतेचे प्रतिक असल्याचे सांगून विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. विद्यापीठात कला अकादमी स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे प्रा.माहूलीकर यांनी आपल्या भाषणात नमूद केले. हाच धागा पकडून पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी विद्यापीठाने शासनाच्या उत्तराची प्रतिक्षा न करता ही अकादमी सुरु करावी असे सांगून संस्थेच्या वतीने 1 लाख 11 हजार रुपयांची देणगी या अकादमीसाठी जाहीर केली.
युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचा हा महोत्सव सप्टेबर महिन्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. कमलेश महाले, सचिन चौधरी, नमिता पाटील व माधुरी पाटील या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघव्यवस्थापकांच्यावतीने डॉ.एच.पी.खोडके, प्रा.योगीता चौधरी आणि प्रा.उर्मिला वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. उपप्राचार्य डॉ.एन.के.पटेल यांनी आभार मानले. पारितोषिकांचे वाचन डॉ.अविनाश निकम व प्रा.यशवंत शिरसाठ यांनी केले.