अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
साकत खुर्द (ता. अहिल्यानगर) शिवारातील कार्ले वस्ती येथे किरकोळ वादाच्या रागातून चौघांनी तरूणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुर्यकांत छबु पवार (वय 40, रा. साकत खुर्द, कार्ले वस्ती) असे जखमी तरूणाचे नाव असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक रंगनाथ वाघ, राजेंद्र रंगनाथ वाघ, विजय आसाराम वाघ आणि शाम राजेंद्र राजेंद्र वाघ (सर्व रा. साकत, कार्ले वस्ती) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी (15 नोव्हेंबर) सकाळी 8.30 च्या सुमारास फिर्यादी चारचाकी वाहनातून आपल्या कामानिमित्त जात असताना कार्ले वस्ती तलावाजवळ संशयित आरोपींनी त्यांना अडवून त्याच्यावर हल्ला केला. एक दिवस आधी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून अशोक वाघने कोयत्याने फिर्यादीच्या दंडावर व हातावर वार करून दुखापत केली.
तर इतर संशयित आरोपींनी फिर्यादीस खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाणीच्या दरम्यान परत आमच्या वाटेला जाऊ नको, नाहीतर जीव घेऊ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. तसेच फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केले आहे. जखमीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस अंमलदार ए. डी. झावरे अधिक तपास करीत आहेत.




