Friday, April 25, 2025
Homeक्राईमCrime News : पूर्ववैमनस्यातून युवकाची अमानुष हत्या

Crime News : पूर्ववैमनस्यातून युवकाची अमानुष हत्या

एलसीबीकडून आणखी पाच संशयित गजाआड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तपोवन रस्ता परिसरातून अपहरण केलेल्या युवकाला एमआयडीसी परिसरातील मोकळ्या जागेत व एका अपार्टमेंटमध्ये अमानुष मारहाण करून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकूड व डिझेलचा वापर करून एमआयडीसीतील केकताई डोंगर परिसरात जाळून टाकल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यात आणखी पाचजणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.30 वाजता वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) हा केस कापण्यासाठी घराबाहेर पडला, मात्र घरी परतला नाही. याबाबत त्याच्या आईने 25 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, वैभव नायकोडी याचे लपक्या नावाच्या व्यक्तीसह तीन अनोळखी साथीदारांनी जबरदस्तीने स्वीफ्ट कारमधून अपहरण केल्याचे समोर आल्यानंतर याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याची नोंद होताच तोफखाना पोलिसांनी अनिकेत उर्फ लपक्या विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारूतराव पाटील, नितीन अशोक नन्नावरे या चार संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांनी अपहरण झालेल्या वैभव नायकोडी गोल्डन प्लॉटिंग, वडगाव गुप्ता येथून पळून गेल्याचे सांगितले. मात्र वैभवचा घातपात झाल्याची शक्यता बळावल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक गठित करण्यात आले.

सुरूवातीला अटक केलेल्या चौघा संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आणखी 5 संशयित आरोपी निष्पन्न झाले. त्यांना नवनागापूर एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. यामध्ये विशाल दीपक कापरे (वय 22, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर), विकास अशोक गव्हाणे (वय 23, रा. वडगाव गुप्ता), करण सुंदर शिंदे (वय 24, रा. शिवाजीनगर, नवनागापूर), रोहित बापुसाहेब गोसावी (वय 20, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) व स्वप्नील रमाकांत पाटील (वय 23, रा. साईराजनगर, नवनागापूर) यांचा समावेश आहे. त्यांना तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी रविवारी दुपारी घटनास्थळी शासकीय पंचासमक्ष पंचनामा केला आहे. यावेळी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.

मृतदेह जाळून हाडे व राख नष्ट केली
अटक केलेल्या सर्व संशयित आरोपींकडे चौकशी केली असता विशाल कापरे याने सांगितले की, 22 फेब्रुवारी रोजी वैभव नायकोडी याचे अपहरण करून त्याला एमआयडीसीमधील एका मोकळ्या जागेत व एका अपार्टमेंटमध्ये अमानुष मारहाण करून ठार मारले. 23 फेब्रुवारी रोजी दुपारी केकताई परिसरातील विळद घाट येथे मृतदेह नेण्यात आला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहावर लाकूड आणि डिझेल टाकून जाळण्यात आला व हाडे व राख नष्ट करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...