अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना केडगाव शिवारातील पुणे बायपास चौक येथील अण्णाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी (23 मे) घडली. प्रशांत बाळासाहेब गारकर (वय 30, रा. मोतीनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष पवार, कृष्णा पवार (पूर्ण नावे माहिती नाही, दोघे रा. केडगाव), अमोल पाडळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नीलक्रांती चौक, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे पुणे बायपास चौक परिसरातून जात असताना संशयित आरोपी संतोष पवार याने त्यांना थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. फिर्यादीने नकार दिल्याने संतोष पवारने रागाने इतर तीन संशयित आरोपींना बोलावले.
त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात संतोष पवारने फिर्यादीला खाली पाडले. अमोल पाडळे याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या बोटावर वार केला, कृष्णा पवारने दगडाने पाठीवर मारले आणि चौथ्या अनोळखी इसमाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अमिना शेख करीत आहेत.