नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या असून ती पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे. आता ज्योतीला पहिला दणका देण्यात आला असून इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोक युट्यूबर ज्योतीला त्यांचा संपर्क म्हणून तयार करत होते. फेसबुक-इंस्टाग्रामची मालकी असलेली कंपनी मेटाने आज अर्थात सोमवारी युट्यूबर ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केले आहे. ज्योती मल्होत्रा इन्स्टा, फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटांच्या संपर्कात होती, असा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीच्या ‘ट्रॅव्हल विथ जो’ या यूट्यूब चॅनलचे ३.७७ लाख सबस्क्राइबर आहेत आणि तिचे इन्स्टाग्रामवर १.३१ लाख फॉलोअर्स आहेत. तपासात असे दिसून आले की ती २०२३ मध्ये कमिशन एजंट्सद्वारे व्हिसा मिळवल्यानंतर पाकिस्तानला गेली होती. तिथे तिची भेट पाकिस्तानी उच्चायोगाचे अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली, ज्याला अलीकडेच भारतातून हाकलून लावण्यात आले आहे.
ज्योती भारतातील मनाली, मसुरी, जैसलमेर, जयपूर आणि काश्मीर अशा पर्यटन स्थळांवर ब्लॉग करून प्रसिद्ध झाली होती. तिने ट्रॅव्हल विथ जो नावाचे यूट्यूब चॅनल चालवले आणि हळूहळू ती एक सोशल मीडिया सेलीब्रिटी झाली. यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीने पाकिस्तान दौर्यादरम्यान पाकिस्तान उच्चायुक्ताच्या पार्टीत हजेरी लावली होती. तिथे ती इतर भारतीय ब्लॉगरसोबत होती. तिथूनच तिच्या कथित गुप्त हेरगिरीच्या कथेला सुरुवात झाली.
ज्योती मल्होत्राला लष्करी किंवा संरक्षण कारवायांशी संबंधित कोणत्याही माहितीबद्दल थेट प्रवेश नव्हता जी तिने शेअर केली असे म्हणता येईल, परंतु ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित लोकांशी थेट संपर्कात होती, असे हिसारचे एसपी शशांक कुमार सावन म्हणाले. “पाकिस्तानी एजन्सीजमधील लोक निश्चितच ज्योतीला ‘संपर्क’ म्हणून तयार करत होते. ती (मल्होत्रा) युट्यूबवर सक्रिय असलेल्या इतर ‘प्रभावशाली व्यक्तीं’च्या संपर्कात होती. ते देखील पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होते.” असेही त्यांनी सांगितले. हे देखील एका प्रकारे युद्धच आहे, ज्यामझ्ये पराकिस्तानी एजन्सीचे लोक हे इन्फ्लुएन्सरना आपल्यासोबत जोडून त्यांचे नॅरेटिव्ह पुढे चालवण्याचा प्रयत्न करतात, असे पोलिसांनी पुढे नमूद केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा