Friday, October 18, 2024
Homeदेश विदेशझाकिर नाईकला मलेशिया भारताकडे सोपवणार? पंतप्रधान इब्राहिम अन्वर म्हणाले…

झाकिर नाईकला मलेशिया भारताकडे सोपवणार? पंतप्रधान इब्राहिम अन्वर म्हणाले…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जर भारताने वादाग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकिर नाईकविरोधात पुरावे दिले, तर आपले सरकार त्याला प्रत्यार्पित करण्यासंदर्भात भारताच्या विनंतीवर विचार करू शकते, असे संकेत मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी दिले आहेत. मंगळवारी (२० ऑगस्ट) त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींबरोबरच्या भेटीनंतर त्यांनी इंडियन काऊन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी हे विधान केले.

इब्राहिम अन्वर म्हणाले, “भारताने यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु, मी येथे केवळ एका व्यक्तीबाबत बोलत नाहीये. मी दहशतवादाच्या प्रश्नावर बोलत आहे. आमचे सरकार झाकीर नाईकप्रकरणी भारत जे कोणते पुरावे सादर करेल, त्याचे स्वागतच करेल. ते पुरावे आम्ही विचारात घेऊ. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही भारत सरकारबरोबर मिळून काम करत आहोत”. झाकीर नाईक हा २०१७ मध्ये भारतातून फरार झाला होता. त्यानंतर त्याने मलेशियात शरण घेतली. त्यावेळी मलेशियाच्या पंतप्रदान महातीर मोहम्मद सरकारने त्यांना सरकारी संरक्षण दिले होते.

- Advertisement -

कोण आहे झाकिर नाईक?
झाकीर नाईक याचा जन्म मुंबईतील आहे. ५८ वर्षाचा असलेला झाकीर नाईक याने वैद्यकशास्त्रात उच्चशिक्षण घेतले आहे. वयाच्या २० व्या वर्षापासूनच तो धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होता. पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) ही संस्था स्थापन केली. पुढे या संस्थेवर भारत सरकारने बंदी घातली. २०२१ मध्ये या संस्थेवरील बंदी आणखी पाच वर्षे वाढवण्यात आली.

झाकीर नाईकवर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याच्यावर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यासह तो अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तो दहशतवादी पथकाच्या रडारवर होता. मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यापूर्वीच त्याने मलेशियाला पलायन केले.

झाकीर नाईक पीस टीव्हीवर धार्मिक प्रवचन द्यायचा. या माध्यमातून तो इतर धर्मांविरोधात द्वेष पसरवायचा. या पीस टीव्हीची स्थापना २००६ साली झाली होती. मात्र सध्या पीस टीव्हीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश अशा अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या