Friday, November 22, 2024
Homeनगरझोळे येथील खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना आले यश

झोळे येथील खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना आले यश

गावातीलच तरुणाला ठोकल्या बेड्या || चिठ्ठीने फुटली प्रकरणाला वाचा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील झोळे येथील साहेबराव भिमाजी उनवणे (वय 77) या वृद्धाचा सोमवारी (दि. 5 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मृतदेह पलंगावर मिळून आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या भेटीत हा घातपात असल्याचे दिसून येत होते. त्यानुसार संगमनेर तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात घटनास्थळीच पेनाने लिहिलेली चिठ्ठी मोठा सुगाव ठरली आहे. त्यानुसार झारखंडमधील एका तरुणीशी गावातीलच भूषण कांताराम वाळे (वय 23) या तरुणाचे समाज माध्यमावरुन प्रेमसंबंध जुळले होते. त्यातूनच त्याने हा खून केला असल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्याने हा खून का केला? आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहे.

- Advertisement -

साहेबराव उनवणे यांच्या डोक्यात टणक वस्तूने वार करुन खून केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी मयताच्या मुलाने दीपक उनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल आहे. सदरचे प्रकरण हे गंभीर असून पोलिसांसाठी गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होते. त्यामुळे घटनास्थळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या होत्या. त्यानुसार वाघचौरे यांनी तीन पथके तयार केली होती. तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शलोमन सातपुते यांच्या सोबत एक पथक, पोलीस उपाधीक्षक वाघचौरे यांच्या कार्यालयातील पोना. राहुल डोके, पोकॉ. राहुल सारबंदे यांचे एक पथक व स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरचे उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्यासोबत एक पथक असे तीन पथके वेगवेगळ्या अंगाने गुन्ह्याचा तपास करत होते.

मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्य, मित्रपरिवार, नातेवाईक तपासणे, घटनास्थळ, सीसीटीव्ही, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंडमधील व्यक्तींचा तपास करणे इत्यादी बाबींवर पथके काम करत होती. अखेर चिठ्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे केलेला तपास, चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्लेषण करुन पथकाने यातील मुख्य आरोपी उघड केला आहे. गावातीलच भूषण कांताराम वाळे (वय 23) यास रात्री उशिरा ताब्यात घेतले असता त्याची बारकाईने विचारपूस करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी त्याची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती.

या ओळखीचे रुपांतर इंस्टाग्रामवरच पुढे प्रेमात झाले होते आणि हे प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी त्याने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. परंतु, या आरोपीला आणखी कोणी मदत केली आहे किंवा कशी? गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे काय याबाबत पोलीस तपास करत आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर यापूर्वी देखील 2 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा भादंवि कलम 302, 363 व दुसरा भादंवि कलम 379 नुसार दाखल आहे. पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख, पोलीस हवालदार शिवाजी डमाळे, अमित महाजन, महेंद्र सहाणे, पोलीस शिपाई बाबासाहेब शिरसाठ, सचिन सोनवणे हे करत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या