Friday, May 3, 2024
Homeनाशिकजि. प. कामकाज चौकशीस सुरूवात

जि. प. कामकाज चौकशीस सुरूवात

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कामकाजाबद्दल पदाधिकार्‍यांनी तक्रार करताच कामाची चौकशी करण्याकरिता विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी नियुक्त केलेल्या सहा अधिकार्‍यांच्या समितीने मंगळवारी (दि.10) चौकशीस सुरूवात केली.

- Advertisement -

या समितीत दोन अधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेत येत प्राथमिक माहिती घेत तपासणीस सुरुवात केल्याचे वृत्त आहे. या अधिकार्‍यांनी विभागातील अधिकार्‍यांकडून काही माहिती घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या विरोधात एकवटविलेल्या पदाधिकारी व सदस्यांनी गेल्या आठवडयात विभागीय आयुक्त माने यांची भेट घेऊन, जि. प. प्रशासनाच्या कामकाजाची तक्रार केली होती.

यात भुवनेश्वरी एस. यांच्या चुकीच्या कामकाजाचा पाढा वाचत, त्यांच्या नियोजनाअभावी, फाईली प्रलंबित ठेवत असल्याने विकासकामांचा निधी खर्च झाला नसल्याचे निर्देशनास आणून दिले होते. त्यावर विभागीय आयुक्त माने यांनी पदाधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून अहवाल मागविला जाईल, असे सांगितले. त्यानुसार सोमवारी विभागीय आयुक्त माने यांनी पत्र काढून,सहा अधिकार्‍यांची समिती नियुक्ती केली.

आज समितीतील सहाय्यक आयुक्त (तपासणी) एस. जी. सांगळे व सहाय्यक संचालक (विकास) चंद्रकांत वानखेडे या सदस्यांनी सामान्य प्रशासन विभागात येऊन चौकशीला प्राथमिक स्वरूपात सुरूवात केली. चौकशीत या सदस्यांनी काही माहिती घेतली असल्याचे समजते. कामाबाबत तक्रारी अनेक असून, विविध विषय असल्याने चौकशीकरिता अनेक बैठकां घ्याव्या लागणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या