Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : आरक्षणानंतर कही खुशी, कही गम..!

Ahilyanagar : आरक्षणानंतर कही खुशी, कही गम..!

2017 तुलनेत अनेकांची विकेट || काहींचा मार्ग बंद तर काहींना घ्यावा लागणार कुटूंबाचा आधार

अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar

कार्यकर्ता घडविणारी संस्था म्हणून पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे पाहिले जाते. या संस्थांच्या निवडणुकीसाठी सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामुळे अनेकांचा निवडणूक लढण्याचा पत्ता कट झाला आहे, तर काहींचा निवडणूक रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर काहींना पत्नीचा आधार घेऊन जिल्हा परिषदेच्या राजकारणात उतरावे लागणार आहे. या आरक्षणामुळे नव्या चेहर्‍यांना संधी मिळणार आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या गटाच्या आरक्षणात अकोलेमध्ये पाच, श्रीरामपूर तीन, राहाता तीन, अहिल्यानगरमध्ये दोन गट राखीव झाल्याने या गटात सर्वसाधारण प्रवर्गसाठी गट राहिले नसल्याचे दिसून येत आहेत. तर पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यात सर्वसाधारण गटांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी जोरदार लढती होण्याची शक्यता आहे. या आरक्षणांमुळे काही जुन्या सदस्यांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे. तर काहींनी संधी हुकली असल्याने त्यांच्यावर वेट अ‍ॅण्ड वॉचची वेळ आली आहे. काहींना पत्नीला निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. त्यांची कोंडी झाली आहे.

YouTube video player

त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेचे राजकारण स्वतःसाठी टिकून ठेवण्यासाठी पत्नीला निवडणूक रिंगणात उभे करावे लागणार आहे. मात्र काहींना कोणताच पर्याय नसल्याने यंदा घरी बसावे लागणार आहे.

2017 ते 2022 च्या तुलनेतील सदस्य स्थिती
अकोले तालुक्यातील सुषमा दराडे यांचा समशेरपूर गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला जालिंदर वाकचौरे यांचा देवठाण गट अनु. जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे. सुनिता भांगरे यांचा राजूर गट राखीव झाला असला तरी पूर्वी हा गट खुला होता. त्यावेळी भांगरे विजयी झाल्या होत्या. आता तर हा गट अनुसूचित जमातीसाठी आहे. यामुळे त्यांना पुन्हा संधी आहे. माजी सभापती कैलास वाकचौरे यांचा धामणगाव आवारी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने या ठिकाणी वाकचौरे कुटूंबातून या ठिकाणी संधी मिळू शकते.

संगमनेर तालुक्यातील समनापुर हा भाऊसाहेब कुटे यांचा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. तर तळेगाव हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालेला आहे. सिताराम राऊत यांचा घुलेवाडी गट हा पूर्वी प्रमाणे सर्वसाधारणसाठी आहे. माजी सभापती अजय फटांगरे यांचा बोटा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. साकूर हा गट पुन्हा सर्वसाधारण असल्याने या ठिकाणी माजी सभापती मिरा शेटे यांना संधी आहे. रामहरी कातोरे यांचा धांदरफळ खुल्या प्रवर्गासाठी आहे.

राहाता तालुक्यातील पुणतांबा गट पुन्हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. पूर्वी हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. कविता लहारे यांचा वाकडी गट अनुसूचित जातीसाठी आरक्षीत झाला आहे. आश्वी बुद्रुक गटाच्या रोहिणी निघते यांचा गट ओबीसी महिलेसाठी, जोर्वे गट ओबीसीसाठी राखीव आहे. लोणी खुर्द येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचा गट ओबीसी साठी राहणार आहे. कोल्हार बु. हा गट 2017 ला अनुसूचित जमातीसाठी राखीव होता यंदा तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहणार आहे

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी असून सुरेगाव गट ओबीसी महिलेसाठी संवत्सर गट खुला झाल्याने राजेश परजणे यांची सोय झाली आहे. तालुक्यातील शिंगणापूर गट ओबीसी महिलेसाठी राखीव असून पोहेगाव बुद्रुक गट सर्वसाधारण महिलेसाठी राहणार आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव गट पूर्वी अनुसूचित जमाती महिलेसाठी होता. यंदा तो अनुसूचित जाती महिलेसाठी, टाकळीभान गट पूर्वी अनुसूचित जमाती महिलांसाठी होतात, तो आता सर्वसाधारण महिलेसाठी, दत्तनगर हा गट सर्वसाधारण होता, तो यंदा अनुसूचित जाती तर बेलापूर गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्याने या दोन्ही ठिकाणी माजी सभापती बाबासाहेब दिघे व शरद नवले यांची राजकीय अडचण झाली आहे.

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी असून पूर्वी हा गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी होता. कुकाणा गट पूर्वी ओबीसी महिलेसाठी होता. तो यंदा सर्वसाधारण महिलेसाठी राहणार असून या ठिकाणी विद्यमान आ. विठ्ठलराव लंघे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला संधी आहे. भेंडा हा गट पूर्वी ओबीसीसाठी होता यंदा तो सर्वसाधारणसाठी असून भानसहिवरा हा गट देखील आता खुला झाला आहे. माजी सभापती सुनील गडाख यांचा खरवंडी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असून पूर्वी हा गट ओबीसीसाठी होता तर चांदा गट सर्वसाधारण महिलेसाठी आणि सोनई ओबीसी महिलेसाठी राहणार असून यातील सोनई गट यापूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होता.

शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने हा गट सर्वसाधारणसाठी खुला झाला असल्याने माजी अध्यक्ष राजश्री घुले यांना या ठिकाणी पुन्हा संधी राहणार आहे. बोधेगाव गट पूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी होता. यंदा तो सर्वसाधारण व्यक्तीसाठी अनुसूचित जातीचा भातकुडगाव गट यंदाही अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव राहणार असून माजी सभापती हर्षदाताई काकडे यांचा लाडजळगाव गट ओबीसी महिलेसाठी असल्याने त्यांना देखील या ठिकाणी संधी राहणार आहे.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव गट पुन्हा सर्वसाधारण निघाल्याने या ठिकाणी राहुल राजळे यांना संधी आहे. तसेच प्रभावती प्रतापराव ढाकणे यांचा भालगावगड देखील पूर्वीप्रमाणे खुला राहणार आहे. तिसगाव जिल्हा परिषद गट खुला असून मिरी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला असल्याने या ठिकाणी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.

नगर तालुक्यातील पूर्वीचा देहर आणि आत्ता झालेला सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, तर जेऊर गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. शरद झोडगे यांचा नागरदेवळे गट अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित झाला असून संदेश कार्ले यांचा दरेवाडी गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाली असल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. निंबळक आणि वाळकी गट ओबीसीसाठी निघाल्याने या ठिकाणी बाळासाहेब हराळ आणि माधवराव लामखडे यांना संधी आहे.

राहुरी तालुक्यातील राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गट पूर्वी अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होता. तो आता ओबीसी महिलेसाठी ब्राह्मणी अनुसूचित जमाती असणारा गट आता सर्वसाधारण व्यक्तीसाठी, गुहा सर्वसाधारण व्यक्तीसाठी ओबीसी असणारा, बारागाव नांदूर आता अनुसूचित जमाती महिलेसाठी तर वांबोरी गट सर्वसाधारण महिलेसाठी पुन्हा आरक्षित झाला आहे.

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गट पूर्वी ओबीसीसाठी होता तो आता सर्वसाधारण महिलेसाठी असून ढवळपुरी हा गट पूर्वी सर्वसाधारण महिलेसाठी होता. यंदाही तो सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. या ठिकाणी विद्यमान आ. काशिनाथ दाते यांच्या कुटुंबातील व्यक्तीसह माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना देखील संधी राहणार आहे. मागील वेळेस सर्वसाधारणसाठी असणारा निघोज गट यंदा ओबीसीसाठी राखीव आहे. या ठिकाणी पुष्पा वराळ यांना संधी आहे. तर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा सुपा जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे हा गट पूर्वी ओबीसी महिलेसाठी होता. तो आता सर्वसाधारण व्यक्तीसाठी कोळगाव हा गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी मांडवगण हा गट सर्वसाधारण महिलेसाठी आढळगाव हा गट सर्वसाधारण महिलेसाठी बेलवंडी हा गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी असल्याने या ठिकाणी माजी सभापती अनुराधाताई नागवडे, पुष्पा गिरमकर यांच्यासह मांडवगण हा गट सर्वसाधारण महिलेसाठी निघाल्याने या ठिकाणी पुन्हा सुवर्णाताई सचिन जगताप यांना संधी राहणार आहे.

कर्जत तालुक्यातील मिरजगाव सर्वसाधारण, चापडगाव गट सर्वसाधारण, महिला तर माजी अध्यक्ष मंजुषाताई गुंड यांचे पती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड यांचा कुळधरण ओबीसीसाठी राखीव झाला असल्याने त्यांची या ठिकाणी सोय झाली आहे. माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या कोरेगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने त्या ठिकाणी ते कोणाला संधी देणार याकडे लक्ष राहणार आहे. राशिन गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे.

जामखेड तालुक्यातील साकत गट सर्वसाधारण व्यक्तीसाठी राहणार असून खर्डा गट यापूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होता. त्या ठिकाणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या स्नुषा वंदना लोखंडे सदस्य होत्या. मात्र हा गट आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने या ठिकाणी अनेकांना संधी राहणार आहे. तसेच अनुसूचित जातीचा असणारा जवळा गट ओबीसी महिलेसाठी राखीव झालेली या ठिकाणी अनेकांना संधी मिळणार आहे.

यांना पुन्हा संधी
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, राजश्रीताई घुले, मंजूषा गुंड, माजी सदस्य राजेश परजणे, माजी सभापती मिरा शिंदे, पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, राजेेंद्र गुंड, माजी सभापती अर्जून शिरसाठ, हर्षदा काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यांची स्वप्ने भंगली
माजी सभापती सुनिल गडाख, अजय फटांगरे, शरद नवले भाजपचे जिल्हा परिषदेतील माजी गट नेते जालिंदर वाघचौरे, शिवसेनेचे सदस्य संदेश कार्ले याचा पत्ता कट झाला आहे.

येथे गणितं बदलणार
आबासाहेब दिघे व शरद नवले यांची राजकीय अडचण
– निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा सुपा गट ओबीसी महिलेसाठी राखीव
– अनुराधाताई नागवडे, पुष्पा गिरमकर, सुवर्णाताई सचिन जगताप यांना संधी
– माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या स्नुषा वंदना लोखंडे सदस्य होत्या. मात्र हा गट आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने या ठिकाणी लढत रंगणार

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...