अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील रखडलेल्या 20 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भात आज सोमवार (दि. 23) रोजी दिल्लीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची तारीख आहे. आज राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुनावणी झाल्यास पुढील महिन्यांत नगरसह राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे आणि सुनावणी न झाल्यास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका आणखी काही काळ रखडणार आहेत.
ओबीसी आरक्षणाने 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यातील 20 जिल्हा परिषदा आणि त्याअंर्तगत मोडणार्या पंचायत समित्यांच्या निवडणूका रखडलेल्या आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून आतापर्यंत नगर पालिका, महानगर पालिका आणि 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणूका झालेल्या आहेत. मात्र, नगरसह राज्यातील 20 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणार्या पंचायत समित्यांच्या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या चक्रात अडकलेल्या आहेत.
राज्यातील 32 जिल्हा परिषदांपैकी 12 जिल्हा परिषदांच्या निवडणूका झालेल्या आहेत. आता उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणूका शिल्लक आहेत. यात नंदुरबार, पालघर, गडचिरोली, नाशिक, धुळे, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नागपूर, ठाणे 57 टक्के, गोंदिया, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, जळगाव, भंडारा, लातूर, बुलढाणा यांचा समावेश आहे. तर नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आरक्षणाची टक्केवारी ही 49 टक्के असली तरी अकोले पंचायत समितीमध्ये 83 टक्के तर श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये 63 टक्के ओबीसी आरक्षण काढण्यात आलेले आहे.
यामुळे राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात घेतलेल्या 12 जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश होवू शकला नव्हता. दुसरीकडे ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणीच्या दिवशी हे प्रकरण पटलावर आलेच नाही. आता सुनावणीची पुढील तारखी ही आज 23 फेबु्रवारीला आहे. त्यावर आज आदेश न झाल्यास आणि सुनावणीच्या तारखा आणखी लांबल्यास यंदा उन्हाळ्यात देखील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका होता की नाही, अशी स्थिती आहे.





