मुंबई | प्रतिनिधी Mumbai
देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर (बॅलेट पेपर) घेण्याचा निर्णय घेतला आहे. मग महाराष्ट्रातच ईव्हीएमचा हट्ट का आणि कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. त्यामुळे या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पटोले यांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी पत्र पाठवले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पूर्णतः फाडला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक असल्याचे पटोले यांनी पत्रात म्हटले आहे.
मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक असून ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट प्रणालीचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला. त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत, असे पटोले यांनी पत्रात नमूद केले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत. या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे. त्यामुळे जनभावनेचा विचार करून या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.




