मुंबई | Mumbai
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवार)जाहीर होत आहेत. १२ जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी एकूण २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी (दि. ०७) रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीसाठी ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. तर राज्यभरात एकूण ६६.२८ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती.
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा निकाल जाहीर होत आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ पैकी १०० जागांचा कल हाती आला आहे. यामध्ये भाजप- ३८, शिवसेना शिंदे गट- २२, राष्ट्रवादी अजित पवार गट- १९, काँग्रेस- ११, शिवसेना ठाकरे गट- ६, राष्ट्रवादी शरद पवार गट- ० आणि इतर ५ जागांवर आघाडीवर आहेत.
दरम्यान, छ. संभाजीनगरमध्ये मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर अजिंठा गटात शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला विजय मिळाला आहे. या गटातून आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद यांचा विजय झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील तासगाव पंचायत समितीच्या पेड गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे हे विजयी झाले आहेत. याशिवाय खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गटात २ आणि खानापूर पंचायत समितीच्या ४ गणामध्ये शिंदे सेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.





