सोलापूर | Solapur
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवार)जाहीर होत आहेत. यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचा समावेश आहे. यात सोलापूरमधील माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांना मोठा धक्का बसला आहे.
हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुतीच्या २७ जागा बिनविरोध
माळशिरसमधील दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा ११०० मतांनी पराभव केला आहे. याशिवाय दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. यामध्ये गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला आहे.
सातपुते चार महिन्यांच्या मुलीला घेऊन आल्या होत्या प्रचारात
माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आपल्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन निवडणूक काळात प्रचार केला होता. चार महिन्याच्या मुलीला घेऊन संस्कृती सातपुते प्रचार करत असल्याने त्यांना महिला वर्गाची मोठी सहानुभूती मिळाली होती. पंरतु, विरोधकांकडून त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात आली होती. एक ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रचार सभा सुरु असताना त्यांच्या मांडीवर सातपुते यांची मुलगी मांडीवर खेळताना दिसली होती.
हे देखील वाचा : ZP Election Result 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ समित्यांसाठी मतमोजणीला सुरूवात





