राहाता |प्रतिनिधी| Rahata
महाराष्ट्राचं खरं वैभव गड-किल्ल्यांमध्ये आणि इथल्या निसर्गात दडलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. इथले ऐतिहासिक किल्ले, नैसर्गिक स्थळे आणि आध्यात्मिक केंद्रे एकत्र आल्यास, हा विभाग एक उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो, असे मत अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले. तर अहिल्यानगर जिल्ह्याचा पर्यटन विकास हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो स्थानिक जनतेच्या आर्थिक उन्नतीचा आणि रोजगाराचा महत्त्वाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन ‘सार्वमत-देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विक्रम सारडा यांनी केले.
‘सार्वमत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राहाता येथे आयोजित पर्यटन मंथन परिषद शनिवारी कुंदन लॉन्स येथे उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी सार्वमत-देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विक्रम सारडा होते. यावेळी सार्वमत सुवर्ण महोत्सवाचे ब्रँड अॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी व मान्यवरांच्या हस्ते सार्वमतच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, इतिहास संशोधक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, पर्यटन अभ्यासक भूषण देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि सार्वमचे संपादक अनंत पाटील उपस्थित होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मिलिंद गुणाजी यांनी सार्वमत समूहाचे आभार मानले आणि एका 50 वर्षे जुन्या वृत्तपत्राचा ब्रँड अॅम्बेसेडर बनणे हा आपला बहुमान असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, मी भटकंतीमुळे ओळखला जातो. महाराष्ट्रातील प्रत्येक डोंगर आणि किल्ला मी जमिनीवरून आणि हवाई छायाचित्रणातून पाहिला आहे. त्यामुळे मला इथल्या किल्ल्यांची आणि निसर्गाची भव्यता पूर्णपणे कळली आहे. गुणाजी यांनी अहिल्यानगर आणि त्याच्या आसपासच्या किल्ल्यांची लांबलचक यादी वाचून दाखवली. बालाघाट डोंगररांगेपासून सुरूवात केली तर अलंग, कुलंग, मदन, कळसूबाई, रतनगड, विश्रामगड, हरिश्चंद्रगड, नाणेघाट, चावंड, शिवनेरी, अगदी खर्डा किल्ल्यापर्यंत हे सर्व एका रांगेत आहेत. रेहेकुरीसारखे अभयारण्य, सांदण व्हॅली आणि सिद्धटेक ही खास पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
कोणत्याही ट्रेकरचे हरिश्चंद्रगड पाहिल्याशिवाय ट्रेकिंग पूर्ण होत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. गुणाजी यांनी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना अपेक्षित प्रसिद्धी का मिळत नाही, यावर प्रकाश टाकला. लोकांना थेट गोवा, केरळ किंवा राजस्थानला जायचे असते, कारण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची त्यांना माहितीच नसते. त्यातच दुर्गम भागात पोहोचण्यासाठी चांगले रस्ते आणि राहण्या-जेवणाची सोय नसते, असे ते म्हणाले. मात्र परिस्थिती बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यात रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे आणि कनेक्टिव्हिटी सुधारत आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी आणि शनिशिंगणापूरसारखी आध्यात्मिक केंद्रे असल्यामुळे येथे आधीच पर्यटकांची मोठी वर्दळ आहे.
या पर्यटकांना त्यांच्या मुक्कामाच्या काळात इतर पर्यटनस्थळांची माहिती दिली, त्यांच्यासाठी प्रवासाचा आराखडा तयार करून दिला आणि गाईड्स उपलब्ध करून दिले, तर ते नक्कीच जिल्ह्याच्या इतर भागात भटकंतीसाठी बाहेर पडतील, असे त्यांनी सुचवले. गुणाजी यांनी खासदार वाकचौरे आणि डॉ. नवनाथ वाव्हळ, भूषण देशमुख यांसारख्या अभ्यासक मंडळींचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, खा. वाकचौरे यांनी जिल्ह्याबद्दल जी माहिती दिली, ती पाहून मी थक्क झालो. त्यांच्याकडे प्रचंड माहितीचा साठा आहे. या माहितीचा योग्य वापर केला आणि त्यांना शासनाचे सहकार्य मिळाल्यास हा भाग नक्कीच एक मोठे पर्यटन केंद्र बनेल.
सार्वमतने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल त्यांनी पुन्हा एकदा आभार मानले. केवळ धार्मिक पर्यटनावर अवलंबून न राहता, जिल्ह्याचा ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठेवा जगासमोर आणण्याची गरज आहे, असे मत त्यांनी परिषदेत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विक्रम सारडा यांनी सार्वमतच्या 50 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, आणीबाणीच्या काळात श्रीरामपूरसारख्या छोट्या तालुक्यातून सुरू झालेल्या सार्वमतने आज 50 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. आम्ही नेहमीच स्थानिक जनतेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे आणि याच ध्येयाने आम्ही विविध विषयांवर परिषदा आयोजित करत आहोत.
त्यांनी शिर्डीच्या पर्यटन क्षमतेवर एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, शिर्डीत दरवर्षी दीड ते दोन कोटी भाविक येतात. परंतु आज रस्ते आणि विमान सेवेसारख्या उत्तम सुविधांमुळे पर्यटक सकाळी येतो आणि संध्याकाळी परत जातो. त्यामुळे स्थानिक पातळीवर अपेक्षित आर्थिक उलाढाल होत नाही. सारडा यांनी युरोपातील पर्यटन-आधारित अर्थव्यवस्थांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, एक पर्यटक जिल्ह्यात मुक्काम करत असेल, तर त्याला टॅक्सी, हॉटेल, गाईड अशा अनेक सेवांची गरज भासते, ज्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. आपल्यालाही आपल्या जिल्ह्यातील पर्यटनाकडे केवळ तीर्थक्षेत्राच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.
सारडा यांनी पर्यटन क्षेत्राला रोजगाराचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून पाहिले. ते म्हणाले, ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात अनेक उद्योगांमधील रोजगार कमी होऊ शकतो, पण सेवा उद्योगात मनुष्यबळाची गरज कायम राहील. पर्यटकांना सेवा देण्याचे काम यंत्र करू शकत नाहीत, त्यासाठी माणूसच लागतो. त्यामुळे आगामी काळात रोजगार निर्मितीसाठी पर्यटन हे एक मोठे क्षेत्र ठरू शकते. मुंबईकर आता लोणावळा, पुणे आणि इगतपुरीला जाऊन थकले आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवीन ठिकाणे आणि अनोखे अनुभव देण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गामुळे शिर्डीला पोहोचणे सोपे झाले आहे, पण त्या पर्यटकाला तीन दिवस आपल्या जिल्ह्यात कसे थांबवून घेता येईल, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्राच्या पर्यटनावर उत्तम अभ्यास असलेले अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्याकडे सारडा यांनी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली. मिलिंद गुणाजी यांच्या अनुभवामुळे जिल्ह्याला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या 50 वर्षांच्या वाटचालीत वाचकांनी सार्वमतवर जो विश्वास ठेवला, तो असाच कायम ठेवा. या परिषदेतून मिळालेल्या विचारांचे मंथन करून जिल्ह्याच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार व्हावा आणि तो सर्व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा आहे. सार्वमत समूह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पर्यटन मंथन परिषदेचे प्रास्तविक संपादक अनंत पाटील यांनी केले. यावेळी सार्वमत-देशदूतचे संचालक तथा सीईओ सुनील ठाकूर, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, व्यवस्थापक महेश गीते, जाहिरात व्यवस्थापक विनोद नेवासकर उपस्थित होते. सूत्रसंचालन निवेदक प्रसन्न धुमाळ यांनी तर आभार श्रीराम जोशी यांनी मानले.




