नवापूर | श.प्र.
तालुक्यातील खोकसे गावासह परिसरात गेल्या आठवडयापासून भुकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. मात्र, काल बुधवारी मोठया प्रमाणावर धक्के बसल्याने या ठिकाणी भुकंप होवून १.२ व १.४ रिश्टर स्केलची सावळदा ता.शहादा येथील भुकंप मापन केंद्रात करण्यात आली आहे. या भुकंपामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ घराबाहेर रात्र काढत असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील खोकसे गावासह परिसरात पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बर्याच दिवसापासून विस्फोटक असा गूढ आवाज येत आहे. हा आवाज कशाचा आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. सदर आवाज हा भुगर्भातून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. तालुक्यातील खोकसे परिसरात बर्याच दिवसापासून विस्फोटक असा गुढ आवाज जाणवत आहे.
मात्र काल दि.२ ऑक्टोंबर रोजी या गुढ विस्फोटक आवाज येण्याचे प्रमाण तासांमध्ये तर काही वेळा मिनिटांमध्ये कमी अधिक तीव्रतेने वाढले काही वेळा या आवाजाची तीव्रता वाढलेली नागरिकांना जाणवत होती. त्यावेळी परिसरात लोकवस्तीत घराची पत्रे हल्ली, भांडी पडले व जमीन कंपित झाल्याचे देखील नागरिकांना जाणवले.
काल बुधवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत परिसरातील नागरीक महिला आबालवृद्ध हे रस्त्यावर, मोकळ्या जागेत बाहेर दिसून आले. याबाबत तालुका व जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती मिळाली त्यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या पोलीस पथकासह खोकसे गावात तळ ठोकून होते.
सावळदा ता.शहादा येथील भुमापन केंद्रात भुकंपाचे १.२ व १.४ रिश्टर स्केलची नोंद खोकसा भागात झाली आहे. खोकसा, कोटखाब, चिचलीपाडा या गावांना आ.शिरीषकुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत, तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता भेट दिली. गावात ग्रामस्थ या भुकंपाच्या धक्क्यामुळे भयभित झाले आहेत.