धुळे | प्रतिनिधी– जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील मुनीमचे काम करणार्यासह त्याच्या सहकार्याच्या दुचाकीला लाथ मारून त्यांच्याकडील सुमारे ११ लाखांची रोकड लुटणार्या धुळ्यातील टोळीला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. टोळीतील पाच जणांकडून लुटीतील रक्कमेपैकी ६ लाख ८४ हजारांची रोकड हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला आहे.
धरणगाव येथे राहणारे व मुनीमचे काम करणारे किशोर पंढरीनाथ पाटील हे त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा यांच्यासह दि. १८ जुलै रोजी सायंकाळी धुळ्यातील जे.बी.रोडवरील श्रीरत्न ट्रेडींग येथुन सोयाबीन विक्रीच्या बिलाचे १० लाख ९१ हजार ९०० रुपये घेवून ते त्यांच्या एमएच १९ बीई १८०७ क्रमांकाच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवुन धरणगाव येथे जात होते. त्यादरम्यान फागणे गावाचे पुढे एका दुचाकीवर दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी तु माझे बहिणीचे नाव का घेतले? असे सांगत दमदाटी केली. त्यामुळे किशोर पाटील हे घाबरुन पुढे गेले असता, दुचाकीवरील दुसर्या तरुणाने त्यांच्या चालल्या दुचाकीस लाथ मारुन दोघांना खाली पाडले. त्यात ते जखमी झाले. तेव्हा दोघा अनोळखी तरूणांनी डिक्कीतील रक्कम घेवुन पळून गेले. याप्रकरणी किशोर पाटील याच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी फिरली तपासाची चक्रे- दरम्यान घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीचा अभ्यास करुन, फिर्यादी किशोर पाटील याच्याकडुन घटनाक्रम जाणुन घेतला. त्यानंतर एलसीबीचे दोन पथके तयार केले. पथकास सुचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पथकाने जे. बी. रोड ते घटनास्थळा पर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासुन बारकाईने विश्लेषण केले असता, प्रत्येक फुटेजमध्ये एक पांढर्या रंगाची ऍसेस मोपेड दुचाकीवर दोन तरुण जातांना दिसत असल्याने व त्यांच्या हालचाली संशयीत दिसुन आल्याने त्यानुसार तपासाचे चक्र फिरविले.
कर्मचार्यानेच रचला कट- त्यानंतर पथकाने श्री रत्न ट्रेडींग येथील कामास असलेला यश विश्वनाथ ब्रम्हे (वय २२ रा.पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) याच्या हालचाली संशयास्पद दिसुन आल्याने त्याला ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्याने गुन्हयाची कबुली दिली.
एक घोडा दो दुल्हे निकल गये- चौकशीत यश ब्रम्हे याने लुटीचा त्याने त्याचे साथीदार राहुल अनिल नवगिरे (वय-२२ रा.पवननगर, चाळीसगाव रोड, धुळे) (फरार), चंद्रकांत रविंद्र मरसाळे (वय २१), सनी संजय वाडेकर (वय २८ रा.मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे), कल्पेश शाम वाघ (वय २६), राहुल शाम वाघ (वय ३१ रा.पवन नगर हुडको, चाळीसगावरोड, धुळे) यांच्यासह कट रचलचे सांगितले. तसेच फिर्यादी पाटील हे दि.१८ रोजी त्याचे श्री रत्न ट्रेडींग येथुन सोयाबीन विक्रीची रक्कम घेवुन धरणगावकडे जाण्यास निघाल्याचा राहुल नवगिरे यास त्याचे मोबाईलवर एक घोडा दो दुल्हे निकल गये, असे कोडवर्डच्या माध्यमातुन सांगितले. त्यानुसार वरील साथीदारांनी वेगवेगळया मोटार सायकलींवर ठिकठिकाणी थांबुन फिर्यादीचा पाठलाग करीत १० लाख ९१ हजार ९०० रूपये लुटून पळून गेल्याचे सांगितले. या आरोपींकडून गुन्हयातील चोरीस नेलेल्या रक्कमेपैकी ६ लाख ८४ हजार रूपये काढुन दिले.
या पथकाची कामगिरी- पथकाने गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करीत ६ आरोपीतांना निष्पन्न करीत धुळे तालुका पोलिसात दाखल लुटीच्या गुन्हा उघडकीस आणला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, एलसीबीचे सपोनि श्रीकृष्ण पारधी, असई. संजय पाटील, पोहेकॉ पंकज खैरमोडे, शशीकांत देवरे, पोना. रविकिरण राठोड, पोकॉ. सुशिल शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोहेकॉ किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, पोना उमेश पवार, पोकॉ विशाल पाटील यांच्या पथकाने केली आहे.
खबरदारी बाळगावी- मोठी रोकड (कॅश) दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवू नये. तसेच रक्कम नेत किंवा आणत असल्याबाबत कोणाही अनोळखी व्यक्ती समोर बोलु नये अथवा माहिती देवु नये, याची खबरदारी बाळगावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.