Wednesday, November 6, 2024
Homeधुळेवीस लाखांच्या तेलाची परस्पर विक्री करीत अपघाताचा बनाव

वीस लाखांच्या तेलाची परस्पर विक्री करीत अपघाताचा बनाव

धुळे तालुका पोलिसांनी केला उघड; मुद्देमाल जप्त, चालकाचा मृत्यू

धुळे | प्रतिनिधी– सुमारे २० लाखांच्या १८ टन खाद्य तेलाची रस्त्यातच परस्पर विक्री करीत टँकर चालकाने केलेला अपघाताचा बनाव धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणला. तसेच खाद्य तेलाचा माल गुजरात राज्यातुन हस्तगत केला. दरम्यान ही फसवणूक करणार्‍या राजस्थानच्या टँकर चालकाचा मृत्यू झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

गुजरात राज्यातील गांधीधाम, कच्छ येथुन दि. २६ ऑक्टोबर रोजी एका तेल कंपनीकडुन व्यापारासाठी खाद्यतेलाच्या ३२ टन मालाची खरेदी प्रेमदास प्रल्हाद सैनानी (रा.अमळनेर जि.जळगाव) यांनी सुमारे ४० लाख रुपयात केली होती. हा माल वाहतुक करुन त्यांना जळगांव येथे आणावयाचा होता. त्यासाठी त्यांनी युगऋषी ट्रान्सपोर्ट कंपनीकडून (गांधीधाम) टँकरची भाडे तत्वावर मागणी केली. त्यानंतर त्यांना खाद्यतेलाच्या वाहतुकीसाठी जीटी १२ सीटी ०५५० क्रमांकाचा टँकर चालकासह पुरवण्यात आला होता.

- Advertisement -

अपघाताची खबर, पहाणीत तफावत- या टँकरद्वारे खाद्य तेल हे गुजरात येथुन जळगावकडे घेवुन येत असतांना दि.१ नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील अकलाड फाटा, मोराणेजवळ अपघात होवुन टँकर पलटी झाले. अशी खबर श्री. सैनानी यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथकासह अपघातग्रस्त टँकरची घटनास्थळी जावून पहाणी केली. तेव्हा टँकरमध्ये शिल्लक खाद्य तेल व जागीच सांडलेले खाद्य तेल यांचे निरीक्षण केले असता त्यामध्ये मोठी तफावत दिसून आली. त्यामध्ये अंदाजे १५ ते १८ टन खाद्य तेल कमी असल्याचे दिसुन आले.

जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी- अपघाताच्या माहितीबाबत तफावत आढळल्याने निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपासाची चक्र फिरवुन टँकरवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी केली. तेव्हा टँकर हे प्रवासादरम्यान सुरतनजीक बराच वेळ थांबुन असल्याचे आढळले. त्यामुळे पथकाने त्या ठिकाणी जावुन चौकशी व तपासणी केली असता तेथे तेलाचे अवशेष दिसुन आले. अधिक माहिती घेतली असता त्याच ठिकाणाहुन स्थानिक सुरत पोलिसांनी खाद्य तेलाचा अवैधसाठा म्हणुन तेथील सर्व खाद्य तेलाच्या टाक्या नुकत्याच जप्त केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संबंधीत पोलिस ठाण्यास जावुन मालाची खात्री केली असता तसेच फिर्यादी सैनानी यांना बोलावुन माल दाखविला असता त्यांनी मालाची तपासणी करुन हा खाद्य तेलाचा माल त्यांचाच असल्याची त्याची खात्री झाली.

चालकानेच माल विक्री केल्याचे स्पष्ट- हा माल कुठुन आला, याबाबत तालुका पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता माल हा टँकरवरील ( क्र.जीटी १२ सीटी ०५५०) चालक सवाईराम खेमाराम जाट (वय ४५ रा. राजस्थान) याने आणुन विकल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद झालेला आहे.

चालकाचा अपघाती मृत्यू- संशयीत आरोपी चालक सवाईराम खेमाराम जाट याचा एका वेगळ्या घटनेत सुरत, गुजरात येथे दि.३ नोव्हेंबर रोजी मोटार अपघातात मृत्यू झाला. याबाबत संबधित वाहन चालकाविरुध्द सुरत पोलिसांकडुन गुन्हा दाखल असुन त्याचा तपास तेथील स्थानिक पोलिसांकडुन सुरु आहे.


१८ टन मुद्देमाल जप्त- या घटनेतील लंपास झालेला सुमारे १८ टन खाद्य तेलाचा माल गुजरात राज्यातुन हस्तगत झालेला असुन त्याची किंमत अंदाजे २० लाख रुपये इतकी आहे. पुढील तपास धुळे तालुका पोलिसाकडून सुरु आहे.

या पथकाची कामगिरी- ही कामगिरी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, पोसई दीपक धनवटे, पोहेकॉं किशोर खैरनार, प्रविण पाटील, पोकॉं कुणाल शिंगाणे, रविंद्र सोनवणे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या