Friday, June 20, 2025
Homeनगर18 गुंतवणुकदारांचे 66 लाख अडकले; 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल

18 गुंतवणुकदारांचे 66 लाख अडकले; 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल

‘सह्याद्री मल्टिसिटी’ गैरव्यवहार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सह्याद्री मल्टिसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या दरेवाडी (ता. नगर) शाखेत चेअरमनसह 13 व्यक्तींनी मिळून 18 जणांची 66 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रमोद राजेंद्र साठे (वय 41, रा. नारायणडोहो) यांनी सोमवारी (9 जून) दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सीईओ, मॅनेजर, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, वित्तीय अधिकारी, कार्यकारी संचालक अशा 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेअरमन संदीप थोरात, व्हाईस चेअरमन प्रिती सागवान यांच्यासह एकनाथ भालसिंग, दिलीप तात्याभाऊ कोरडे, ईश्वर मचे, संतोष रोकडे, नवनाथ लांगडे, विश्वास पाटोळे, संजय कर्पे, पियुष संचेती, सुधाकर शेलार, शारदा फुंदे (पूर्ण नावे माहिती नाही) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी साठे यांनी 2022 सालापासून या संस्थेमध्ये 9 लाख रूपयांची गुंतवणूक केली होती. संस्थेकडून सुरूवातीला 15 टक्के व्याजदर आणि नियमित परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करवून घेतली गेली. संस्थेचे चेअरमन थोरात याच्यासह दिलीप कोरडे, प्रिती सांगवान, एकनाथ भालसिंग, विश्वास पाटोळे, संजय चिरके, ईश्वर मचे, संतोष रोकडे, शुभम करपे, पियुष संचेती इत्यादींनी साठे व इतर ठेवीदारांचा विश्वास संपादन करून पैसे गोळा केले.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संस्थेने काही काळ दरमहा व्याज स्वरूपात आणि थोडीथोडकी रक्कम रोख व ऑनलाईन स्वरूपात परत केली. मात्र सप्टेंबर 2023 नंतर दरेवाडी शाखेचे कामकाज पूर्णतः बंद करण्यात आले. त्यानंतर मुख्य शाखा, सावेडी (नगर) येथूनही व्यवहार बंद झाल्याने अनेक गुंतवणूकदार अडचणीत आले. दरम्यान, संस्थेने ठेवीदारांना वेगवेगळ्या तारीख व वेळेवर फसव्या चेकव्दारे आणि खोटी पत्रे देऊन उशीराने रक्कम परत करण्याची फसवी हमी दिली. अखेरीस संशयित आरोपींनी विविध बहाण्यांनी उर्वरित रक्कम न देता वेळ मारून नेत गुंतवणूकदारांना अंधारात ठेवले. अनेक वेळा तक्रार देण्याचा इशारा दिल्यावर गुन्हेगारांनी धमकी व कायदेशीर गुंतागुंत दाखवून तक्रार रोखण्याचा प्रयत्न केला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण आर्थिक फसवणुकीत फिर्यादी साठे यांच्यासह 18 गुंतवणूकदारांचा समावेश आहे. एकत्रित 91 लाख 91 हजार 610 रूपये रक्कम असून त्यातील केवळ 25 लाख 85 हजार 500 रूपये परत करण्यात आले आहेत. म्हणजेच तब्बल 66 लाख 6 हजार 110 रूपये गुंतवणूकदारांना मिळालेले नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीतून स्पष्ट झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : रात्री संशयास्पद हालचाली करणारे चौघे पकडले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar रात्रीच्या वेळी शहर व उपनगरात संशयास्पदरीत्या फिरणार्‍या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी आणि अहिल्यानगर...