कर्मचार्यांची कमतरता असल्याने नागरिक वेठीस
जळगाव- महापालिकेच्या तिसर्या मजल्यावरील जन्म-मृत्यू विभागात दाखले काढण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र असून त्यातच अपुरे मनुष्यबळ आणि शासनाने बदल केल्या नवीन पोर्टलमधील त्रुटींचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यातच सर्व्हर डाऊनच्या फटक्यामुळे मृत्यूचे दाखल्यासाठी उशिर होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिक देखील वेठीस धरले जात आहे.
जन्म- मृत्यू दाखले वितरीत करण्यासाठी शासनाकडून सीआरएस पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलमध्ये शासनाकडून जून महिन्यात काही बदल करण्यात आले असून आता शासनाकडून डीसीसीआरएस नावाचे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे सर्व महानगरपालिका व नगरपरिषदांमार्फत जन्म व मृत्यू दाखले वितरीत करण्यात येत आहेत. परंतु सदर पोर्टलची गती अतिषय कमी झाल्यामुळे आधी दिवसाला १०० दाखले दिले जात होते तर आता फक्त २० ते २५ दाखले दिवसातून दिले जात आहेत. यामुळे नागरिकांना १५ ते ३० दिवस दाखल्यांसाठी महानगरपालिकांमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. महाराष्ट्र शासनाने विकसीत केलेल्या डीसीसीआरएस पोर्टलमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटींचा नागरिकांना फटका बसत आहे. कधी ओटीपी येत नाही तर कधी दाखले डाऊनलोड होत नाही, तसेच कधी कागदपत्र अपलोड होत नाही तर, कधी दाखल्यामध्ये दुरुस्ती होत नसल्याच्या समस्या येत असल्यामुळे कर्मचार्यांसह नागरीक त्रस्त झाले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत जन्म-मृत्यू विभागात मृत्यचे दाखले काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. बहुतांश नागरिक घरातील एखादा व्यक्ती वारल्यानंतर घराचा उतारर्यावर किंवा जमिनीच्या उतार्यावरुन नाव कमी करुन घेण्यासाठी आणि घरातील कर्त्या व्यक्तीचे नाव लावण्यासाठी शासकीय कामानिमित्त मृत्यू दाखला आवश्यक झालेला आहे. या महत्वाच्या कागदपत्रांसाठी ऐनवेळी नागरिकांना फिराफिर करावी लागत असल्याचे अनुभव अनेकांना येत आहे. त्यामुळे घरातील एखादा व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या उत्तरकार्य संपल्यानंतर मृत्यू दाखल्याचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात पायपीट करावी लागत असते. तसाच अनुभव काही नागरिकांना आज आला. चार-पाच दिवसांपासून महापालिकेची पावती फाडल्यानंतरही तात्काळ किंवा एका दिवसात दाखला मिळत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विचारणा केली असता, महापालिकेत काही सेवापूर्तीनंतर कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे. या रिक्त जागेवर दुसरा कर्मचारी येत नसल्याने इतर कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यातच नवीन कर्मचारी त्या टेबलवर आला तरी त्याला समजवून घेण्यासाठी चार-सहा महिने जात असल्याने या विभागात पेंडींगचा ढिग वाढत जातो. तसाच प्रकार महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात येऊ लागला आहे. तसेच महापालिकेच्या तिसर्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून दाखले काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सायंकाळी देखील गर्दी कमी होण्याचे नावच नाही. त्यातच कमी कर्मचारी आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मृत्यूच्या दाखल्यासाठी महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात नागरिकांना तास-तास उभे राहून आपला नंबर येण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. काही वेळेस नंबरवरुन नागरिकांमध्ये बाचाबाची होत असल्याचे चित्र आहे.
२०० दाखल्यांची वाढली पेंडसी
महापालिकेच्या तिसर्या मजल्यावरील जन्म-मृत्यू विभागात या दाखल्यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, जळगाव शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखांवर आहे. त्यातच दरदिवशी जळगाव शहरात कोणीतरी व्यक्तीचे निधन होत असून त्या घरातील व्यक्तीचे नातेवाईक दाखला काढण्यासाठी महापालिकेतच येत असून या महिन्याभरात दाखले काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातच ऑनलाईन कामात सर्व्हर डाऊन तर कधी नेट हळूहळू चालत असल्याचा फटका बसत असल्याने नागरिकांचे अर्ज पेंडसी २००च्यावर गेल्याची माहिती मनपाच्या सूत्रांकडून मिळाली.
नागरीक अन् मनपा कर्मचार्यांमध्ये वाद
महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागाकडून जन्म- मृत्यू दाखले वितरीत करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन दाखले वितरीत करणार्या सीआरएस पोर्टलमध्ये शासनाकडून बदल करण्यात आल्यामुळे या पोर्टलवरून दाखले डाऊनलोड करणे, कागदपत्र अपलोड करण्यासाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे नागरिकांना पंधरा ते एक महिन्यानंतर दाखले मिळत असल्याने नागरीक व मनपा कर्मचार्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे चित्र आहे.
दिलासा देण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावेत
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात पोर्टलच्या संथ गतीमुळे कामकाज ठप्प झाले आहे. राज्यभरातील सर्वच नगरपालिकांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर पर्याय म्हणून मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात तीन ते चार कर्मचारी व अत्याधुनिक संगणक दिल्यास पोर्टलच्या समस्येवर काही प्रमाणात मार्ग काढता येणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने तीन ते चार कर्मचारी द्यावेत, अशी मागणी होत आहे.
राज्यभरातील नगरपालिकांमध्ये जन्म-मृत्यू दाखले वाटपाची समस्या निर्माण झाली आहे. यावर पर्यायी मार्ग म्हणून अतिरीक्त संगणक व कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन कर्मचारी व दोन संगणक मिळावे अशी मागणी आपण वरीष्ठांकडे केली आहे.
डॉ. विजय घोलप,
जन्म-मृत्यू विभाग प्रमुख, जळगाव मनपा