Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखसुट्टीत जमवा पुस्तकांशी मैत्री

सुट्टीत जमवा पुस्तकांशी मैत्री

विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागले आहेत. सुट्टीत तरी धमाल करता येईल अशी आशा मुलांच्या मनात पल्लवित झाली आहे. पूर्वी सुट्टी कधी सुरु व्हायची आणि कधी संपायची तेच कळत नव्हते अशा आठवणीत पालक रंगून जातात. तथापि सुट्टी लागलेली नाही तरीही  अनेक पालकांना मुलांचे सुट्टीत काय करायचे हा प्रश्न सतावत असावा. समाजमाध्यमांवरील पालकांच्या समुहात तशी चर्चा देखील सुरु झाल्याचे आढळते. विद्यार्थी वर्षभर अभ्यासाचे आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे वाहातात.

किती पालक मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे भवितव्य ठरवायची परवानगी देतात? किंबहुना अपूर्ण इच्छा मुलांनी पुर्ण कराव्यात अशीच बहुसंख्य पालकांची अपेक्षा असते. महिना-दीड महिन्याच्या सुट्टीतही त्यांचे वेळापत्रक व्यस्त असावे आणि मुलांना कुठेतरी अडकवून टाकावे असे पालकांना का वाटते? सुट्टी मुलांच्या मनासारखी घालवू द्यायला, त्यांच्याही नकळत त्यांना जीवनकौशल्ये शिकवण्यासाठी सुट्टी उपयोगात आणता येते. मुले वाचत नाहीत ही बहुसंख्य पालकांची तक्रार असते. मुलांचे निसर्गाशी व पुस्तकांशी मैत्र करुन देण्यासाठी सुट्टीचा उपयोग करुन घेता येऊ शकेल. वाचनाने माणसाचे जीवन समृद्ध होते. पुस्तकांमुळे मुलांना नवीन जगाची ओळख होते. आव्हाने स्वीकारुन त्यांच्यावर मात करण्याची प्रेरणा मिळते.

- Advertisement -

त्यांच्याचसारखी माणसे कष्टसाध्य यश कसे मिळवतात हे समजते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, वाचाल तर वाचाल, कष्टाविना फळ ना मिळते अशा अनेक म्हणींचे व्यावहारिक दाखले थोरामोठ्यांच्या आत्मचरित्रांमधून मिळू शकतात.  व्यक्तीमत्वाच्या सर्वांगीण जडणघडणीत पुस्तके फार महत्वाची भूमिका बजावतात. म्हणुनच ‘वाचाल तर वाचाल’ असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. वाचनाचा तास सक्तीचा करावा अशी सूचना द्रष्टे शिक्षणतज्ञ डॉ. अरुण निगवेकर यांनी केली होती. वर्षभर पाठ्यपुस्तके हेच मुलांचे जग असते. सुट्टीत त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावता येऊ शकेल. वाचनामुळे आयुष्यावर होणार्‍या संस्कारांची महती पटलेली अनेक माणसे आणि संस्था वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी झटतात. समाजमाध्यमांवर एक रिक्षावाले प्रसिद्ध झाले आहेत. ते त्यांच्या रिक्षात छोटुसे वाचनालय चालवतात. प्रत्येक प्रवासी रिक्षात कमीत कमी पंधरा मिनिटे तरी बसतो. या वेळेत त्यांनी पुस्तक चाळावे आणि जमले तर थोडेतरी वाचावे अशीच त्यांची अपेक्षा असणार.

नाशिक जिल्ह्यात एका आजींनी त्यांच्या हॉटेलमध्येच ग्रंथालय उभारले आहे. जेवणाबरोबर वाचनाचीही मेजवानी लोकांना मिळावी याच इच्छेने त्या पुस्तकांची मायेने देखभाल करतात. मुलांना वाचनाचे वेड लावावे लागते. पुस्तकाचे एखादे पान फाटले तरी चालेल पण मुलांना पुस्तके हाताळू द्यावीत. पुस्तकांचा विशिष्ट सुगंध अनुभवू द्यावा अशी धारणा असणारे काही पालकही आढळतात. पण हातात पुस्तक घेऊन वाचले म्हणजेच वाचन केले ही व्याख्या काळाबरोबर बदलत आहे. अनेक मुले ऑनलाईन पुस्तके वाचू किंवा ऐकू लागली आहेत. मुलांना मोबाईलचे वेड असते. या वेडाचा वाचनासाठी सकारात्मक उपयोग पालकांना करुन घेता येऊ शकेल.  त्यामुळे मुलांच्या मनात पुस्तकांविषयी रुची आणि उत्सुकता निर्माण होऊ शकेल. त्यातून वाचनाकडे त्यांचा कलही वाढू शकेल. तात्पर्य, मुलांना वाचनवेडे बनवायला सुट्टी उपयोगात आणता येऊ शकेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या