येवला । प्रतिनिधी Yeola
शहरातील विंचूर चौफुली येथे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत निर्मला बाळासाहेब भिसे (वय ५०, रा. पहिलवान गल्ली, येवला) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
विंचूर चौफुली ते फत्तेबुरुज नाका या मार्गावर एकही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांचा अनेकदा गोंधळ उडतो. परिणामी अचानक ब्रेक मारणे, वाहने पुढे-मागे घेणे किंवा चुकीच्या दिशेने वळणे अशा घटना वारंवार घडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या मार्गावर तातडीने दिशादर्शक फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग आणि इतर आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.




