मुंबई । Mumbai
“या देशात लोकशाही वाचवण्यासाठी लढणारा प्रत्येक नागरिक गांधींच्या विचारांचा वारसदार आहे. गांधीजी हा या देशाचा आत्मा आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचा कणा आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे मन आहेत. या महामानवांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही,” अशा घणाघाती शब्दांत ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते अभिजीत दिपके यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका आंदोलनादरम्यान ते बोलत होते. भारतातील लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत, सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन केले.
गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित या आंदोलनात बोलताना दिपके म्हणाले, “आजच्या दिवशी आपल्या संवैधानिक हक्कासांठी रस्त्यावर उतरणे हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली आहे. गांधीजींचा विचार गोळ्या झाडून किंवा दबाव आणून संपवता येत नाही. नथुराम गोडसेची विचारधारा मानणारे हजारो येतील आणि जातील, परंतु हा देश नेहमी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरू यांच्याच विचारांवर पुढे जात राहील.”
आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. पंतप्रधानांच्या विधानांचा समाचार घेताना ते म्हणाले, “देशातील जनतेला सातत्याने वेगवेगळ्या कारणांसाठी रांगेत उभे करण्याचे काम या सरकारने केले आहे. कधी नोटाबंदीच्या काळात बँकांच्या रांगेत, कधी कोरोना काळात लशीसाठी, तर आता मतदार यादीतील नाव नोंदणी आणि दुरुस्तीसाठी सामान्य जनतेला ताटकळत ठेवले जात आहे.”
देशातील निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करत दिपके म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यात अपयश येत असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.




