Monday, September 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : सार्वजनिक सौजन्याची ऐसीतैशी

पडसाद : सार्वजनिक सौजन्याची ऐसीतैशी

राजकीय नेत्यांची भाषा हा कधीतरी संशोधनाचा विषयही होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु सध्या ज्या पद्धतीची भाषा दिल्ली ते गल्ली व्हाया मुंबई वापरली जात आहे, ते पाहता एखाद्या समाजशास्त्राच्या अभ्यासकाला नक्कीच हा विषय संशोधनासाठी खुणावू शकतो. अलिकडेच शिवसेना ठाकरे पक्षातून सहा खासदार फुटल्यानंतर प्रवक्ते संजय राऊत यांनी जो शिव्यांचा यथेच्छ वापर केला आणि त्याला तशाच भाषेत प्रत्युत्तर खासदार संजय दिना पाटील यांनी दिले, ते पाहिल्यावर राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार असा प्रश्न पडला. संजय पाटलांनी तर नंतर पत्रकारांवरच हल्ला चढवून थेट मारण्याचीच भाषा केल्यानंतर राज्यभर संताप व्यक्त झाला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली खरी, पण त्यांच्या नेत्यांनी अशाही परिस्थितीत समोरच्यांनी डिवचले म्हणून त्यांचा राग अनावर झाला, अशी शाब्दिक कसरत केलीच.

- Advertisement -

हेच लोण आता थेट नाशिकच्या प्रभाग समितीच्या सभेपर्यंत आले आहे. भाजपचे नेते सुधाकर बडगुजर व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुकेश शहाणे यांच्यात भर प्रभाग सभेत जो काही शिव्यांचा सडा पडला, त्याने तेथे उपस्थित असलेल्या भगिनींची मान शरमेने खाली गेली. दोघांचीही राजकीय कारकीर्द कोलांटउड्या मारण्याची तर आहेच, शिवाय राजकारणासाठी काहीही करण्याची तयारी असलेलीही आहे. मुकेश शहाणे यांच्यावर तर काही गुन्हेही दाखल होते. बडगुजर यांच्यावरील सलीम कुत्ता प्रकरणातील बालंट गेले असले तरी राजकीय गुन्हे आहेच. ऐन निवडणुकीच्या काळात दोघांनीही पक्षांतर केले. पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले शहाणे यांना राष्ट्रवादीने तर उबाठाच्या बडगुजर यांना भाजपने पावन करून घेतलेले आहे. उभयतांमधील राजकीय संघर्ष आजचा नाही. अनेक वर्षांपासून त्यांच्यातील जीवघेणा संघर्ष नाशिककरांनी पाहिलेला आहे.

ऐन निवडणुकीच्या काळातही थेट हाणामार्‍यापर्यंत प्रकरण गेले होते. नाशिककरांच्या सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने पण दोघेही विजयी झाले आणि त्यांच्यातील राजकीय स्पर्धा प्रत्यक्ष महापालिकेतही सुरू झाली. परवाच्या सभेत खरेतर सिडको भागातील दूषित पाणी व अपुऱा पाणीपुरवठा या विषयावर बोलण्यासाठी सगळेच नगरसेवक तयारीने आले होते. प्रत्यक्षात फुटकळ कारणावरून दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद आणि नंतर अत्यंत खालच्या पातळीवरील शिव्यांची लाखोली वाहण्यात झाला. उपस्थित सगळेच दिग्मूढ झाले. कोणालाही त्यांना आवरावेसे वाटले नाही, हे अधिक गंभीर. विशेष म्हणजे, भाजपचे बहुमत असताना पक्षाच्या एकानेही बडगुजरांच्या समर्थनासाठी किंवा वाद थांबविण्यासाठी पुढाकार घेतला नाही. शहाणे यांचा अविर्भावच असा असतो की त्यांच्या नादी शक्यतो कोणी लागत नाही.

अखेरीस काही नगरसेविका उठल्या आणि त्यांनी दोघांनाही येथे महिला बसल्या आहेत याचे भान बाळगण्याचे आवाहन केले, तेव्हा कुठे दोघेही भानावर आले आणि नंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्षाची या वादाला किनार असावी असे आता बोलले जात आहे. बडगुजर यांनी एकटे पाडण्याची खेळी तर यामागे नव्हती ना, असाही सवाल विचारला जात आहे. अर्थात, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी किमान यापुढे तरी सार्वजनिक ठिकाणी सौजन्याची शिकवण नेते, कार्यकर्त्यांनी अंगी बाणवावी अशी अपेक्षा केली तर ती चुकीची ठरू नये.

शिवीगाळ हे अज्ञान आणि विकारांचे प्रतीक मानले जाते. मनाची दुर्बलता तसेच असंतुलनाचा तो परिपाक असल्याचे संत सांगत तसेच आता मानसशास्त्र अभ्यासकही सांगतात. क्षमाशीलता, संयम आणि समभाव हाच खरा तर त्यावरील रामबाण उपाय आहे. पण शहाणेंसारख्यांना हे कोण आणि कसे समजावून सांगणार, हा खरा प्रश्न आहे. बडगुजरांना एकापरीने महाजन चार शब्द तरी सांगू शकतात. शहाणेंबाबत तर तीदेखील शक्यता नाही. कारण, ते स्वयंभू नेते आहेत. अपक्ष म्हणून निवडून येताना त्यांनी भाजपसह सर्वच पक्षांना घाम फोडून प्रचंड मते घेतली होती. त्यामुळेच राष्ट्रवादीने निकाल लागल्यानंतर पहिल्याच गाडीने त्यांना आपल्यात सामावून घेतले. त्यासाठी त्यांना लागलीच स्थायीचे सदस्यत्वही दिले. त्यांना मिळणार्‍या या विशेष महत्त्वामुळे जुन्याजाणत्या नेत्या डॉ. हेमलता पाटील या कितीतरी दिवस नाराज होत्या.

आता राष्ट्रवादी यासंदर्भात शहाणेंची कशी शिकवणी घेते ते बघावे लागेल. भाजपकडून बडगुजर यांची शिकवणी ही नक्कीच घेतली जाईल, असे दिसते. कारण महासभेत महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी ज्या कठोर शब्दात दोघांचीही हजेरी घेऊन यापुढे असे होणार नाही, याची हमी घेतली त्यावरून हा विषय हलक्यात घेऊ नका, असा कदाचित पक्षाचाच आदेश असावा. मुळात, समिती सभेसारख्या ठिकाणी दोघांनीही व्यक्तिगत रागलोभ आणायलाच नको होते. त्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून स्वीकारलेला समाजमाध्यमांचा पर्याय त्यांना तसाही खुला होताच. त्यावर यथेच्छ शिवीगाळ, धमक्या, एकमेकांचे उद्धार करणे चालू होतेच. हेच कशाला, त्यांचे कार्यकर्तेही एकमेकांवर मुक्तहस्ते शिव्या व आरोपांचा वर्षाव करीत आहेतच. त्यामुळे खरेतर त्यांच्यातील विकाराचे निरसन एव्हाना व्हायला हवे होते. असो, यापुढे दोघेही सार्वजनिक ठिकाणी सभ्यता पाळतील ही अपेक्षा.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 275 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 11084 कॅरेटची आवक झाली....