ओझे | विलास ढाकणे | Oze
वणी पोलीस ठाण्याच्या (Vani Police Station) प्रभारी अधिकारी पदाची सूत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड (Hemant Phad) यांनी शनिवार (दि.०५ सप्टेंबर) रोजी अधिकृतपणे हाती घेतली आहेत. जगदंबा देवीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या नवीन कार्यकाळाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांचीही बदली झाली आहे. या नव्या नियुक्तीमुळे वणी पोलीस प्रशासनात नवीन पर्व सुरू झाले असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान नव्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.
विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारीचे वास्तव
वणी पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र अतिशय विस्तीर्ण असून अंतर्गत ६९ गावे, खेडे व पाड्यांचा समावेश होतो. खेडगाव आणि कोशिंबा ही आऊटपोस्ट, तर वणी, लखमापूर, माळेदुमाला व वणी ग्रामीण ही प्रमुख बिटे येतात. गुजरात व महाराष्ट्र (Gujarat and Maharashtra) या दोन राज्यांना जोडणारे वणी हे दिंडोरी तालुक्यातील प्रमुख शहरवजा केंद्र आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्येचा भार असणाऱ्या या क्षेत्रात लखमापूर एमआयडीसी, करंजवण आणि कादवा कारखान्यांमुळे औद्योगिक वाद, ग्रामीण टोळीयुद्ध आणि संवेदनशील वस्त्यांचा ताण नेहमीच पोलिसांवर असतो.
अवैध धंद्यांवर वचक बसवण्याचे आव्हान
परिसरातील अवैध दारू विक्री, गुटखा विक्री, अमली पदार्थांची तस्करी, मटका जुगार आणि वाळू तस्करी यांसारख्या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर वचक निर्माण करणे हे नव्या अधिकाऱ्यांपुढील मुख्य आव्हान आहे. तसेच शाळा-कॉलेज परिसरातील रोडरोमिओगिरी आणि दुचाकींचे कर्णकर्कश आवाज यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
सामान्य नागरिकांच्या अपेक्षा
राजकीय दबावाला बळी न पडता, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करावी आणि अवैध धंदे पूर्णपणे बंद करून कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, हीच सपोनि हेमंत फड यांच्याकडून वणीकरांची मुख्य अपेक्षा आहे.




