नाशिक । प्रतिनिधी Nashik
आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मोर्चाला काँग्रेसच्या नेत्यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या संघर्षात काँग्रेस पक्ष खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही देत लवकरच ‘आदिवासी संघर्ष यात्रा’ काढण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
याप्रसंगी विधानसभेचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील मृत्यूंची वाढती संख्या अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक असल्याची टीका करण्यात आली. विद्यार्थ्यांचे मृत्यू क्रिकेटच्या स्कोअरप्रमाणे वाढत असताना सरकारची असंवेदनशीलता अधिक धक्कादायक आहे. या गंभीर प्रश्नावर सरकारने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी सपकाळ व वडेट्टीवार यांनी केली.
वसतिगृहांमधील सेंट्रल किचन व्यवस्था तात्काळ रद्द करावी, विद्यार्थ्यांना सकस, रुचकर व वेळेवर आहार मिळावा, विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, तसेच बिंदू नामावलीतील आदिवासींचे स्थान अबाधित ठेवावे, या मागण्या पूर्णपणे न्याय्य असल्याचे सांगितले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच ‘आदिवासी संघर्ष यात्रा’ काढण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ठोस चार्टर तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक लढा उभारण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही पद-पदवीची अपेक्षा न ठेवता एकजुटीने उभारलेला हा संघर्ष प्रेरणादायी आहे. हा लढा केवळ आहार किंवा वसतिगृहांच्या प्रश्नांपुरता मर्यादित नसून आदिवासी अस्मिता, संस्कृती, शिक्षण आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाचा लढा आहे. महाराष्ट्रासह दिल्लीतही आदिवासी समाजाच्या हक्कांसाठीच्या या संघर्षात काँग्रेस खांद्याला खांदा लावून सहभागी राहील, अशी ग्वाही देण्यात आली.




