अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
2025-26 च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या तसेच बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारच्या सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो) आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 30 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 1 हजार 792 विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, त्यासाठी 2 कोटी 61 लाख 61 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 33 विहिरींची कामे सुरू झाली असून, प्रत्यक्षात 21 विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान, सरकारच्या मृद व जलसंधारण (रोहयो) विभागाकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येकी विहीरीसाठी कमाल 30 हजारांची मदत देण्यात येणार आहे. यात पडझड झालेल्या विहींसाठी एकूण मदतीच्या 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर पुर्णत्वाचा दाखला, त्याची फोटो रोजगार हमी विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केल्यानंतर उर्वरित 50 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 1 हजार 792 विहिरींपैकी 1 हजार 543 लाभार्थ्यांना 2 कोटी 24 लाख 89 हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अद्याप 249 लाभार्थ्यांना अनुदान मिळणे बाकी असून, त्यासाठी 36 लाख 71 हजार रुपयांची तरतूद आवश्यक आहे. विशेष म्हणजे, अनुदान वितरित होऊनही विहिरींच्या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही.
तालुकानिहाय आकडेवारी पाहता जामखेड तालुक्यात सर्वाधिक 527 विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 474 लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाले असून 53 लाभार्थी अद्याप प्रतीक्षेत आहेत. मात्र, या तालुक्यात एकाही विहिरीचे काम सुरू झालेले नाही. राहुरी तालुक्यात 166 विहिरींपैकी 69 लाभार्थ्यांना अनुदान मिळाले असून, 97 लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित आहे. कोपरगावमध्ये 136 पैकी 47, तर पारनेरमध्ये 12 पैकी एक विहिरीचे काम सुरू झाले आहे. शेवगाव तालुक्यात 199, राहाता येथे 83, श्रीरामपूर येथे 76 आणि श्रीगोंदा तालुक्यात सात विहिरींना मंजुरी मिळाली आहे. या तालुक्यांमध्ये अनुदान वितरण पूर्ण झाले असले तरी कामांच्या पूर्ततेचे प्रमाण अत्यल्प आहे.
दरम्यान, काही ठिकाणी लाभार्थी काम करण्यास इच्छुक नसल्याचेही प्रशासनाच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. नगर तालुक्यात एका, पाथर्डीत दोन आणि संगमनेरमध्ये एका लाभार्थ्याने काम करण्यास अनिच्छा दर्शविल्याचे लेखी कळविले आहे. नेवासा तालुक्यात सहा लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक नसल्याची नोंद आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना सिंचनाची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. मात्र, निधी मंजुरी आणि अनुदान वितरणानंतरही प्रत्यक्ष कामांना गती मिळत नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकर्यांना सिंचनासाठी पुन्हा अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तालुकानिहाय नुकसान झालेल्या विहीरी
नगर 162, अकोले 4, जामखेड 527, कर्जत 93, कोपरगाव 136, नेवासा 171, पारनेर 12, पाथर्डी 135, राहाता 83, राहुरी 166, संगमनेर 21, शेवगाव 199, श्रीगाेंंदा 7 आणि श्रीरामपूर 76 एकूण 1 हजार 792 विहीरींचा समावेश आहे.




