अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यात पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झालेल्या 9,692 नवनियुक्त शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बदललेला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतींची ओळख करून देण्यासाठी 7 दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचे उद्घाटन 3 डिसेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची संख्या 109 वरून 123 करण्यात आली आहे.
या सात दिवसांच्या प्रशिक्षणाचे उद्घाटन येत्या गुरुवारी (तीन डिसेंबर) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी), बदललेला अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके, अध्यापनाच्या नव्या पद्धती; तसेच मूल्यमापनातील बदल याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शनिवारी दिली. शालेय शिक्षण विभागाच्या पत्रकार परिषदेत सिंह बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक मंगेश जोशी, सहसंचालक कमलादेवी आवटे उपस्थित होते.
नवनियुक्त शिक्षकांचे शैक्षणिक प्रशिक्षण पूर्ण होऊन बराच काळ लोटला आहे. या काळात शालेय शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यानुसार अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, शिकविण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेत बदल झाले आहेत. या बदलांशी शिक्षकांना जुळवून घेता यावे आणि नव्या शैक्षणिक दृष्टिकोनानुसार अध्यापन करता यावे, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणात शिक्षकांची अध्यापन क्षमता विकसित करण्यावर विशेष भर असेल. प्रत्यक्ष कृती आणि अनुभवातून शिकविण्याच्या पद्धती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य, क्षमता आणि व्यावसायिकता यांवर आधारित शिक्षण देण्याची शैली यांचा समावेश असेल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन कसे करावे, याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय, शाळा प्रवेशोत्सव, पहिले पाऊल, निपुण महाराष्ट्र आणि शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा यांसारख्या उपक्रमांची माहिती शिक्षकांना दिली जाईल. उत्कृष्ट काम करणार्या शाळांचे उपक्रम, आदर्श अध्यापन पद्धती आणि यशस्वी शिक्षकांचे अनुभव व मार्गदर्शन यांचाही प्रशिक्षणात समावेश असेल, असे सिंह यांनी सांगितले.




