Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : नाशिक..? नव्हे, चिखलपूर

राज-का-रण : नाशिक..? नव्हे, चिखलपूर

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

विकासकामांमुळे सध्या सर्वत्र जी काही स्थिती उ‌द्भवलेली आहे ती पाहता नाशिकसह त्र्यंबकेश्वरचीही (Nashik-Trimbakeshwar) तीर्थक्षेत्र ही ओळख पुसत चालली असून, दोन्ही ठिकाणी शहराला एका विद्रूप आणि भयानक चिखलकोंडीने विळखा घातला आहे. निमित्त आहे, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचे! सिंहस्थाच्या नावाखाली शहरात सुरू असलेली अर्धवट कामे, त्यातच कोसळणारा वरुणराजा आणि प्रशासकीय नियोजनाचा पुरता उडालेला बोजवारा… या त्रिगुणामुळे आज नाशिककर अक्षरशः नरकयातना भोगत आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

- Advertisement -

नाशिक म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो गोदामाईचा संथ प्रवाह, पवित्र रामकुंडावरील आणि मंत्रोच्चार सात्विक शांतता. (अर्थात आजकाल सायंकाळच्या दोन आरत्यांच्या गोंगाटात ही सात्विक शांतताही तशी लोप पावली आहेच, म्हणा) पण आज याच नाशिकसह त्र्यंबकेश्वरचीही ओळख पुसत चालली असून, दोन्ही शहराला एका विद्रूप आणि भयानक चिखलकोडीने विळखा घातला आहे. निमित्त आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचे! सिंहस्थाच्या नावाखाली शहरात सुरू असलेली अर्धवट कामे, त्यातच कोसळणारा वरुणराजा आणि प्रशासकीय नियोजनाचा पुरता उडालेला बोजवारा… या त्रिगुणामुळे आज नाशिककर अक्षरशः नरकयातना भोगत आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. सरकारने सिंहस्थासाठी तब्बल ३४ हजार कोटी रुपयांचा भव्य-दिव्य आराखडा जाहीर केला खरा; पण प्रत्यक्षात मात्र सर्वत्र ‘आनंदीआनंद पाहायला मिळत आहे. हा आराखडा नेमका किती कोटीचा हेदेखील कोणीच अधिकृतरीत्या सांगत नाही. कोणी २५, कोणी ३४ तर कोणी ३६ हजार कोटी सांगतात, अधिकृत पातळीवर सिंहस्थाच्या आराखड्याव्यतिरिक्त काही कामे ही सिंहस्थासाठी म्हणून केली जात असून त्याचा या किमतीत समावेश आहे की नाही, हेदेखील कळायला मार्ग नाही.

नाशिक व त्र्यंबकेश्वर ही सिंहस्थ पर्वणींची दोन्ही पवित्र ठिकाणे या कामांमध्ये अंतर्भूत तर आहेतच, शिवाय शिर्डी, भीमाशंकर, वेरुळ अजिंठा, सप्तशृंगी गड, कावनई, टाकेद अशा काही तीर्थ व पर्यटन क्षेत्रांचाही विकास योजनांमध्ये समावेश असल्याचे सांगितले जाते. यातील कावनई व सर्वतीर्थ टाकेद यांना सिंहस्थाची काही पार्श्वभूमी तरी आहे; पण इतर क्षेत्राबाबत तसे नाही. सिंहस्थाच्या नावाखाली राज्यातील उर्वरित क्षेत्रांचाही विकास होणार असेल तर त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. पण एकाच वेळी एवढा मोठा घास घेण्याच्या नादात ठसका लागू शकतो. तसेच काहीसे सध्या झाले आहे. त्याचमुळे नाशिक त्र्यंबकची कामे अंमळ उशिरा तर सुरू झालीच, शिवाय आता त्यात पावसानेही सुरुवात केल्याने दररोज जे हाल होत आहेत त्याला खरोखरच पारावार राहिलेला नाही. सिंहस्थ जवळ येत असल्याच्या थाटात संपूर्ण नाशिक शहरात एकाच वेळी खोदकाम सुरू करण्यात आले. द्वारका चौफुलीचे अत्याधुनिकीकरण, द्वारका ते नाशिकरोड रस्त्याचे विस्तारीकरण, तसेच शहरातील रस्ते रुंदीकरण, भुयारी गटारे, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांच्या नावाखाली संपूर्ण शहर खोदून काढले गेले. कोणतीही पूर्वकल्पना किंवा टप्प्याटप्प्याने काम करण्याचे नियोजन न ठेवल्यामुळे आज शहरातील प्रत्येक प्रमुख रस्ता हा खड्यांच्या विळख्यात आहे. संपूर्ण जून महिना पाऊस पडलाच नसल्याने या कामांना किमान काही उसंत तरी मिळाली.

एका अधिकार्‍याने तर ज्या पद्धतीने कामांची प्रगती चालली आहे ती पाहता एल निनो आमच्या मदतीला धावून आला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खरे तर पाऊस लांबल्याने केवळ शेतकरीच नव्हे तर सरकारही हवालदिल झाले असताना सिंहस्थाची जबाबदारी असलेले काही जण मात्र या नैसर्गिक परिस्थितीचे आभार मानत आहेत. कोणाचे काय तर कोणाचे काय! उशिरा का होईना; पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचे आगमन होताच या अर्धवट कामांनी आपले अक्राळविक्राळ रूप उघड केले. खड्डे आणि खोदलेल्या मातीवर पाऊस पडल्यामुळे आज संपूर्ण नाशिक चिखलात बुडाले आहे. लांबलेला पाऊस आला आणि घामाने चिंब झालेल्या आयुष्याला थंडावा मिळाला याचा आनंद मानावा की याच पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलाने झालेली अवस्था पाहून चिडचिड करावी अशा वेगळ्या कोंडीतही नाशिककर सापडले आहेत. मुख्य रस्ते असोत की गल्लीबोळ, पाय ठेवण्यास जागा उरलेली नाही, दुचाकी घसरत आहेत, पादचाऱ्याऱ्यांना चालणे कठीण झाले आहे आणि वाहतूककोंडीने तर नाशिककरांचा श्वास कोडला आहे. नाशिक की चिखलपूर? असा उद्विग्न सवाल आज प्रत्येक नागरिक विचारत आहे. महापौर हिमगौरी आहेर-आडके या मात्र अशा स्थितीत पदर खोचून रस्त्यावर उतरून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते आहे. सोबत उपमहापौर विलास शिंदेदेखील असतात. आयुक्त मनीषा खत्री यांनी तर ठेकेदारांना तंबी देऊन तत्काळ कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. एका ठेकेदाराला तर झालेला रस्ता फुटला म्हणून नव्याने करायला सांगितला आहे. हे सगळे चांगलंच आहे. त्यातून या समस्येची तीव्रता त्यांनाही दिसते आहे, हे कळते; पण तरीदेखील समस्या एवढी खोलवर पसरली आहे की यंदाचा पावसाळा हा नाशिककरांसाठी आयुष्यभराची भळभळती जखम ठरतो की काय असे वाटू लागले आहे.

मो. ९३२५३ ८३०९२

नियोजनाचा अभाव

कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी येतो, हे प्रशासनाला ठाऊक नव्हते का? सिंहस्थाची तयारी किमान तीन ते चार वर्षे आधी सुरू होणे अपेक्षित असते. परंतु ऐनवेळी जाग येणे आणि पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण शहर खोदून ठेवणे, हा अकार्यक्षमतेचा कळस आहे. विविध सरकारी विभागांमध्ये समन्वयाचाही अभाव वारंवार जाणवतो. वास्तविक, सिंहस्थासाठी स्वतंत्र प्राधिकरण आहे. तरीही अंमलबजावणीच्या पातळीवर गडबडी दिसतात. एका विभागाने रस्ता तयार केला की दुसरा विभाग तो खोदण्यासाठी येतो. या समन्वय हीनतेचा बळी आज नाशिकचे नागरिक ठरत आहेत, अधिकारी एसी केबिनमध्ये बसून बैठकांचे सत्र चालवत आहेत, तर जनता मात्र रस्त्यावरील चिखलात चाचपडत आहे. ज्या गोदावरी नदीच्या तीरावर सिंहस्थ साजरा होतो, त्या गोदामाईची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली नदीपात्रात काँक्रिटीकरण करण्यात आले, ज्यामुळे नदीचे नैसर्गिक स्रोत बंद झाले. आता अर्धवट कामांमधील माती, राद्यरोडा आणि सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. पाणवेलीची समस्या तर जणू वैश्विक असल्यागत झाली असून त्याबाबत प्रशासकीय हतबलता तर कल्पनेपलीकडची आहे. पवित्र रामकुंड परिसरातही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. भाविक पवित्र स्नानासाठी येतात, पण येथील दुर्गंधी आणि अस्वछता पाहून तोंड फिरवून निघून जातात. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर ती नाशिकची आणि संपूर्ण महाराष्ट्राची जागतिक स्तरावर ओळख करून देण्याची मोठी संधी असते. यंदा तर न भूतो असा हा सोहळा करण्याचा संकल्प राज्य सरकारने सोडलेला आहे. कोट्यवधी भाविक या सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. जर स्थानिक नागरिकांनाच या अर्धवट कामामुळे एवढा त्रास होत असेल, तर येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना आपण कोणता नरक दाखवणार आहोत? सबब, ३४ हजार कोटीच्या आकड्यांचे फुगे हवेत सोडणे बंद करून सरकारने आणि प्रशासनाने आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून नेमक्या समस्या काय आहेत आणि त्यावर तातडीने उपाय काय करता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. येणाऱ्या सिंहस्थामुळे आताच जर नाशिककर एवढे त्रासले असतील तर ते या सोहळ्याच्या स्वागताच्या मनःस्थितीत कसे राहतील, याचा विचार तातडीने करायला ह्या, नाशिककरांचा संयम आता सुटत चालला आहे. ‘आनंदीआनंद’ असणारा हा कारभार जर तत्काळ सुधारला नाही, तर सिंहस्थाच्या यशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि नाशिकच्या वाट्याला केवळ बदनामीच येईल, हे निश्चित.

हजारो कोटींचा आराखडा : स्वप्न की मृगजळ?

काही महिन्यांपूर्वी सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा मोठ्या दिमाखात केली होती. या निधीतून नाशिकचा कायापालट होईल, जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण होतील, असे दावे करण्यात आले होते. कागदावरचा हा आराखडा पाहून नाशिककरांनाही वाटले होते की आपले शहर खरोखरच ‘स्मार्ट’ होणार, परंतु आजची परिस्थिती पाहता हा ३४ हजार कोटींचा आराखडा केवळ एक ‘कागदी वाघ’ किंवा निवडणुकीचे ‘मृगजळ’ ठरतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एवढा अवाढव्य निधी मंजूर होऊनही जर पहिल्याच पावसात शहराची ही दुरवस्था होत असेल, तर तो पैसा जातोय कुठे? नियोजनाचा इतका प्रचंड अभाव कसा असू शकतो? प्रत्यक्षात जमिनीवर जी कामे सुरू आहेत, ती दर्जाहीन आणि संथगतीने चालली आहेत. ‘सगळाच आनंदीआनंद’ अशी परिस्थिती असून, केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी तर ही धाई चाललेली नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. प्रशासनाच्या या नाकर्तेपणाचा थेट फटका सामान्य नाशिककरांना बसत आहे. रस्त्यांवरील चिखल, साचलेले पाणी यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोसारख्या आजारांनी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले तर आश्चर्य वाटायला नको, संपूर्ण महानगरात रस्ते, भुयारी गटार, पावसाळी गटार, महानगर गॅस, ऑप्टिकल फायबर, पाणीपुरवठा अशा तब्बल बाराहून अधिक सुविधांची कामे एकाच वेळी, तीदेखील सर्वत्र चालू आहेत. काही कामे ही टप्याटप्याने करता आली नसती का, असा सवाल आता विचारण्यातही अर्थ नाही. आम्ही आहोत ना, काळजीचे कारण नाही, अशा शब्दात महायुतीचे नेते आश्वस्त करीत असले तरी प्रत्यक्ष लोकांना जे काही दररोज भोगावे लागत आहे. त्याची भरपाई कशी होणार हे कोण सांगणार? खड्ड्यांमुळे तर वाहनांचे अतोनात नुकसान होत आहे. गॅरेजबाहेर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूककोंडीमुळे इंधनाचा आणि वेळेचा अपव्यय तर होत आहेच; शिवाय त्यामुळे रोजगारावर जाणाऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे. चिखलावरून दुचाकी घसरून दररोज शेकडो छोटे-मोठे अपघात होत आहेत. काही ठिकाणी तर जीवघेणे प्रसंगही ओढवले आहेत. या अपघातांची छायाचित्रे, रिल्स माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत, लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी सरकारच्या आणि महापालिकेच्या कारभारावर संतप्त चर्चा होत आहेत. सिंहस्थ हा नाशिककरांसाठीचा अभिमानाचा सोहळा असायला हवा, पण सध्याच्या परिस्थितीमुळे ही भावना पार गळाठली आहे.

ताज्या बातम्या

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

0
मुंबई । Mumbai NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध...